चेन्नई IPL 2024 CSK vs LSG : केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्सनं (LSG) इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मधील 5 वा सामना जिंकलाय. मंगळवारी झालेल्या सामन्यात त्यांनी ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) 6 गडी राखून पराभव केला. चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर हा सामना खेळण्यात आला.
स्टॉइनिसच्या शतकानं एकहाती विजय :या सामन्यात चेन्नई संघानं नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करत 211 धावांचं लक्ष्य ठेवलं. हे लक्ष्य गाठताना लखनौ संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. संघानं 33 धावांत 2 विकेट गमावल्या होत्या. यानंतर मार्कस स्टॉइनिसनं डाव सावरला. देवदत्त पडिक्कल (13) सोबत 55 धावांची भागीदारी केली. त्यानंतर स्टॉइनिसनं निकोलस पूरन (34) सोबत 34 चेंडूत 70 धावांची भागीदारी केली. त्यानंतर स्टॉइनिसनं 56 चेंडूत आयपीएलमधील त्याचं पहिलं शतक पूर्ण केलं. स्टॉइनिसनं 63 चेंडूत नाबाद 124 धावा करत शतक झळकावलं. या खेळीत त्यानं 6 षटकार आणि 13 चौकार लगावले. तर चेन्नई संघाचा एकही गोलंदाज सामना जिंकून देण्याकरता प्रभावी कामगिरी करू शकला नाही. मथिशा पाथिरानानं सर्वाधिक 2 बळी घेतले. तर मुस्तफिजुर रहमान आणि दीपक चहर यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.
गायकवाडचं दमदार शतक :तत्पूर्वी चेन्नई संघानं नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावून 210 धावा केल्या. संघाकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडनं 56 चेंडूत शतक झळकावलं. त्यानं 60 चेंडूत 108 धावांची नाबाद खेळी खेळली. यादरम्यान त्यानं 3 षटकार आणि 12 चौकार लगावले. तर शिवम दुबेनं अवघ्या 27 चेंडूत 66 धावा केल्या. त्यानं 7 षटकार आणि 3 चौकार मारले. दुसरीकडे लखनौ संघासाठी कोणताही गोलंदाज चांगली कामगिरी करु शकला नाही. मॅट हेन्री, मोहसीन खान आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.