अनंतपूर Ruturaj Gaikwad : आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदामुळं ऋतुराज गायकवाडचा दक्षिणेकडील राज्यांमध्ये मोठा चाहतावर्ग आहे. याचं एक दृश्य दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यातही पाहायला मिळालं. आंध्र प्रदेशातील अनंतपूर इथं इंडिया सी आणि इंडिया डी यांच्यातील सामन्यादरम्यान एका चाहत्यानं सुरक्षा कठडे तोडत तो मैदानात उतरला आणि इंडिया सी संघाचा कर्णधार असलेल्या गायकवाडच्या पायाला स्पर्श करुन परतला. सामन्यात हे अप्रतिम दृश्य पाहून त्याचे चाहते खूप खूश आहेत. दुसरीकडे, सुरक्षेतील प्रचंड त्रुटी असल्याचंही या घटनेचं वर्णन केलं जात आहे. यामुळं कोणत्याही खेळाडूचं नुकसान होऊ शकतं.
चाहत्याला कोणतंही नुकसान नाही :ऋतुराज गायकवाड भारतीय संघासाठी अनेक सामने खेळू शकलेला नाही. तो अजूनही संघातील स्थान पक्कं करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, आयपीएल आणि देशांतर्गत सामन्यांमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळं तो भारतीय क्रिकेटचा मोठा स्टार बनला आहे. आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये त्याचा खेळ पाहण्यासाठी त्याचे अनेक चाहते आले होते. यातील एकानं बॅरिकेडिंग ओलांडून गायकवाडला भेटण्यासाठी मैदानात दाखल झाला. मात्र, चाहत्याचं उद्दिष्ट फक्त सीएसकेच्या कर्णधाराला भेटायचं होतं. त्यामुळं त्याच्या पायाला स्पर्श करुन तो परतला. यात त्याला कोणतीही हानी झाली नाही. गायकवाडसाठी चाहत्यांनी बॅरिकेड्स ओलांडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही देशांतर्गत स्पर्धांमध्ये अशा घटना अनेकदा घडल्या आहेत.