सेंट लुसिया CPL 2024 : कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये 3 सप्टेंबर रोजी दोन संघांमध्ये सामना झाला. हा सामना सेंट लुसिया किंग्ज विरुद्ध अँटिग्वा आणि बारबुडा फाल्कन्स यांच्यात होता. या दोन संघांमधील स्पर्धेमध्ये फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली सेंट लुसिया किंग्जनं विजय मिळवला. ख्रिस ग्रीनच्या नेतृत्वाखाली अँटिग्वा आणि बारबुडा फाल्कन्सला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. दोन्ही संघांमधील विजय आणि पराभवाचा फरक एक खेळाडू होता, ज्यानं त्याच्या 4 षटकांच्या स्पेलमध्ये कहर केला होता. सेंट लुसियाचा विजय निश्चित करणाऱ्या खेळाडूचं नाव नूर अहमद आहे.
24 पैकी 14 चेंडूत एकही धाव दिली नाही : अफगाणिस्तानचा नूर अहमद, CPL 2024 मध्ये सेंट लुसियाकडून खेळत आहे. त्यानं अँटिग्वा आणि बारबुडा फाल्कन्स संघाला त्याच्या चेंडूंवर नाचायला लावलं. त्यानं आपल्या 4 षटकांतील 24 चेंडूंपैकी 14 चेंडू निर्धाव टाकले. म्हणजे यात एकही धाव दिली गेली नाही.
एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही : 19 वर्षीय नूर अहमदच्या नेतृत्वाखालील सेंट लुसियाच्या धारदार गोलंदाजीसमोर अँटिग्वा आणि बारबुडा फाल्कन्स संघाला 20 षटकांत 7 गडी गमावून केवळ 142 धावा करता आल्या. त्यांच्या संघातील एकाही फलंदाजानं मोठी खेळी केली नाही. 26 चेंडूत 36 धावा करणारा सलामीवीर जस्टिन ग्रीव्हस संघाचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. याशिवाय दोन फलंदाजांना 20 धावांचा आकडा ओलांडता आला, त्यापैकी एक होता इमाद वसीम जो 29 धावा केल्यानंतर नाबाद राहिला.