बार्बाडोस Chris Jordan Hat-Trick : वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या टी 20 क्रिकेट विश्वचषकाच्या 49 व्या सामन्यात, इंग्लंड क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डननं अमेरिका संघाविरुद्ध हॅट्ट्रिक घेण्याचा पराक्रम केला. यासह तो आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये हॅट्ट्रिक घेणारा इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरला आहे. त्यानं अमेरिकेविरुद्ध पाच चेंडूत 4 विकेट घेतल्या, त्यामुळं प्रथम फलंदाजी करणारा अमेरिका संघ केवळ 115 धावांवर गारद झाला. विशेष म्हणजे 14 तासांपूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सनं हॅट्ट्रिक घेतली होती.
पाच चेंडूत घेतले चार बळी : जॉर्डननं अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी केली आहे. या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेचा संघ 18.5 षटकात केवळ 115 धावा करत गडगडला. अमेरिकेकडून नितीश कुमारनं सर्वाधिक 30 आणि कोरी अँडरसननं 29 धावा केल्या. मात्र इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जॉर्डनसमोर अमेरिकन संघ असहाय्य दिसत होता. जॉर्डननं 2.5 षटकांत 10 धावांत 4 बळी घेतले. यात त्यानं हॅट्ट्रिकही घेतली. जॉर्डननं डावाच्या 19व्या षटकात ही कामगिरी केली. अली खान, नॉथुश केंजिगे आणि सौरभ नेत्रावलकर यांना लागोपाठच्या चेंडूंवर बाद करून त्यानं हॅट्ट्रिक साधली. जॉर्डननं षटकाच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर या तीन विकेट घेतल्या. त्याचे बळी ठरलेल्या तिन्ही खेळाडूंना आपलं खातंही उघडता आले नाही.