नवी दिल्ली Divya Deshmukh Chess : भारतीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुखनं बुद्धिबळ स्पर्धेत आलेला भयावह अनुभव शेयर केला. या आरोपांमुळे क्रीडा जगतात एकच खळबळ उडाली आहे. प्रेक्षकांना महिला बुद्धिबळपटूंच्या खेळापेक्षा त्या कशा दिसतात?, कसे कपडे घालतात?, कशा वावरतात?, त्यांचे केस कसे आहेत? यावर लक्ष केंद्रित करण्यात जास्त रस असतो, असा गंभीर आरोप दिव्यानं केलाय. दिव्यानं इंस्टाग्रामवर पोस्ट शेयर करत आपला संताप व्यक्त केला.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर : नागपूरच्या 18 वर्षीय दिव्या देशमुखनं सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर केली. यात तिनं सामन्यादरम्यान आलेले वाईट अनुभव सांगितले. दिव्यानं लिहिलं की, "मला यावर खूप दिवसांपासून बोलायचं होतं. पण मी स्पर्धा संपण्याची वाट पाहत होते. माझ्या लक्षात आलं की, बुद्धिबळात प्रेक्षक महिला खेळाडूंना खूप हलक्यात घेतात". तिनं पुढं लिहिलं की, "अलीकडेच मी स्वतः याचा अनुभव घेतला. मी काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली ज्याचा मला अभिमान आहे. मात्र लोकांनी मला सांगितलं की, प्रेक्षकांचं लक्ष केवळ माझ्या खेळाकडेच नाही तर माझे कपडे, केस, उच्चार यासारख्या महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींकडे आहे".