वडोदरा Baroda Beat Mumbai : रणजी ट्रॉफी 2024-25 मध्ये विजेतेपद राखण्यासाठी उतरलेल्या मुंबईला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईला कृणाल पांड्याच्या बडोद्याविरुद्ध 84 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. बडोद्यानं मुंबईला विजयासाठी 262 धावांचं लक्ष्य दिलं होतं. प्रत्युत्तरात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईचा संघ 177 धावा करुन सर्वबाद झाला.
पहिल्याच सामन्यात मुंबईचा पराभव : रणजी ट्रॉफी 2024-25 चा चालू हंगाम 11 ऑक्टोबरपासून सुरु झाला आहे. पहिल्या फेरीत 16 सामने खेळले गेले. यात मुंबईचा पहिला सामना बडोद्याविरुद्ध होता. हा सामना वडोदरा इथं झाला या. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बडोद्यानं 290 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ 214 धावाच करु शकला. पहिल्या डावात 76 धावांची आघाडी घेतलेला बडोद्याचा संघ दुसऱ्या डावात 185 धावांवर बाद झाला. मुंबईच्या तनुष कोटियननं दुसऱ्या डावात 5 विकेट घेत बडोद्याला स्वस्तात बाद करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ऑफस्पिनर तनुष कोटियननं पहिल्या डावातही 4 बळी घेतले होते.
सिद्धार्थचं अर्धशतक मात्र मुंबईचा पराभव : परिणामी सामना जिंकण्यासाठी मुंबईला विजयासाठी 262 धावांचं लक्ष्य मिळालं. खराब झालेल्या खेळपट्टीवर हे लक्ष्य अजिबात सोपं नव्हतं. पण ज्या संघात अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ असे क्रिकेटपटू आहेत, त्यांच्या मुंबईसंघानं शरणागती पत्करणं अपेक्षित नव्हतं. श्रेयस अय्यर 30 धावा करुन बाद झाला तर रहाणे आणि पृथ्वी शॉ 12-12 धावा करुन बाद झाले. 137 धावांत 8 विकेट गमावल्यानंतर सिद्धार्थ लाडनं (59) मुंबईला निश्चितपणे 177 धावांपर्यंत नेलं. मात्र त्याची खेळी संघाचा पराभव टाळू शकली नाही.
मुंबई संघात चार कसोटीपटू : मुंबई संघात चार कसोटी क्रिकेटपटू होते, तर बडोदा संघात एकही खेळाडू नव्हता. या सामन्यात अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ आणि शार्दुल ठाकूर मुंबईकडून खेळले. बडोद्याकडे आंतरराष्ट्रीय अनुभव असलेला एकच क्रिकेटर (कृणाल पंड्या) होता. कृणाल पांड्यानं दुसऱ्या डावात 55 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
हेही वाचा :
- IPL 2025 पूर्वी मुंबई इंडियन्सचा मोठा निर्णय; 3 वेळा IPL चॅम्पियन बनवलेल्या दिग्गजाचा संघात समावेश, हार्दिकचं कर्णधारपद जाणार?