लाहोर AUS vs ENG 4th Match Live : चॅम्पियन्स ट्रॉफीचा चौथा सामना आज 22 फेब्रुवारी रोजी खेळला जात आहे. हा सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेट संघात लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर सुरु आहे. या दोन्ही संघांमधील सामन्याचा उत्साहही भारत-पाकिस्तान सामन्यासारखाच आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे दोन्ही संघ पाकिस्तानच्या भूमीवर पहिल्यांदाच एकमेकांसमोर येणार आहेत, ज्यामुळं हा सामना आणखी खास बनतो.
साहेबांच्या संघाची प्रथम फलंदाजी : या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथनं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली. डावाच्या दुसऱ्याच षटकात सलामीवीर फिल साल्ट 10 धावा काढून बाद झाला. बेन द्वारशीसच्या गोलंदाजीवर अॅलेक्स केरीनं त्याच्या अफलातून झेल घेतला. यानंतर डावाच्या 6व्या षटकात जेमी स्मिथ (15) देखील बेन द्वारशीशचा बळी ठरला. यानंतर जो रुट आणि बेन डकेट दीडशतकी भागीदारी झाली, अखेर 31व्या षटकात झंपानं रुटला (68) बाद करत ही भागीदारी तोडली. तसंच यानंतर 35व्या षटकात झंपानं ब्रूकला (3) बाद केलं. यादरम्यान एका टोकानं बेन डकेटनं शतक झळकावलं आहे, परिणामी इंग्लंडच्या 41व्या षटकात 270हून अधिक धावा झाल्या आहेत.
दोन्ही संघांची खराब कामगिरी : दोन्ही संघांनी अलिकडच्या काळात वनडे क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केलेली नाही. पाकिस्तानविरुद्ध घरच्या मैदानावर आणि श्रीलंकेविरुद्ध त्यांच्याच मैदानावर वनडे मालिका गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ या स्पर्धेत येत आहे. दुसरीकडे, इंग्लंडला वनडे मालिकेत भारताकडून वाईट पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय दुखापती आणि निवृत्तीमुळं ऑस्ट्रेलिया संघातून 45 खेळाडूंना आधीच वगळण्यात आलं आहे. एवढंच नाही तर 2009 पासून कांगारु संघाला या स्पर्धेत एकही सामना जिंकता आलेला नाही. अशा परिस्थितीत, 16 वर्षांचा दुष्काळ संपवण्याच्या उद्देशानं ते हा सामना खेळतील.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंडचा विक्रम :चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडनं ऑस्ट्रेलियावर बाजी मारली आहे. दोघांमध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 5 सामन्यांमध्ये इंग्लंडनं 3 वेळा विजय मिळवला आहे, तर ऑस्ट्रेलियानं 2 वेळा विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियन संघानं 2006 आणि 2009 च्या आवृत्तीत इंग्लंडला पराभूत केलं होतं. 2009 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं इंग्लंडला शेवटच्या वेळी पराभव केला होता. याचा अर्थ असा की गेल्या 16 वर्षांपासून त्यांना या स्पर्धेत इंग्लिश संघाला हरवता आलेलं नाही. इंग्लंडनं 2013 आणि 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लढतींमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आहे. या आयसीसी स्पर्धेत दोन्ही संघांमधील पहिली लढत 2004 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये झाली होती आणि तिथंही इंग्लंडनं विजय मिळवला होता.