T20 World cup 2024 AUS vs SCO :टी-20 विश्वचषक 2024 च्या 35 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं स्कॉटिश संघाचा 5 गडी राखून पराभव केलाय. ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचा इंग्लंड संघाला फायदा झालाय. ऑस्ट्रेलियानं सामना जिंकताच इंग्लंडनं सुपर-8 मध्ये स्थान पक्कं केलंय. तर या पराभवामुळं स्कॉटलंड संघाचा विश्वचषक स्पर्धेतील प्रवास संपलाय. या सामन्यात स्कॉटलंड संघानं प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला 181 धावांचं लक्ष्य दिलं. या धावाचा ऑस्ट्रेलियानं सहज पाठलाग केला. ट्रॅव्हिस हेडनं या सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी सर्वात मोठी खेळी खेळली. त्यानं 49 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं 68 धावा केल्या.
स्कॉटलंडची फलंदाजी : स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल स्टार्कनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात स्कॉटलंडच्या फलंदाजांनी मागील सामन्यांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली. सलामीवीर जॉर्ज मुनसेनं 35 धावांचं योगदान दिलं. ब्रेंडन मॅकमुलननं अर्धशतक झळकावलंं. त्यानं 34 चेंडूत 6 षटकारांसह 60 धावांची खेळी केली. तो मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत होता, पण ॲडम झाम्पानं त्याला झेलबाद केलं. कर्णधार रिची बेरिंग्टननं 42 धावा केल्या. या खेळाडूंमुळे स्कॉटलंड संघाला 20 षटकांत 180 धावांपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलनं सर्वाधिक 2 बळी घेतले.
ट्रॅव्हिस हेडनं- मार्कस स्टॉइनिसची दमदार खेळी :ऑस्ट्रेलियन संघासाठी आघाडीच्या फळीतील फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. डेव्हिड वॉर्नर 1 धाव करून, मिचेल मार्श 8 धावा करून आणि ग्लेन मॅक्सवेल 11 धावा करून बाद झाला. पण ट्रॅव्हिस हेड आणि मार्कस स्टॉइनिस यांनी उत्कृष्ट अर्धशतकं झळकावली. या खेळाडूंच्या दमदार फलंदाजीमुळंच ऑस्ट्रेलियन संघ सामना जिंकण्यात यशस्वी ठरला. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडनं 68 आणि मार्कस स्टॉइनिसनं 59 धावा केल्या. स्कॉटलंडकडून मार्क वेट आणि सफयान शरीफ यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. पण बाकीचे गोलंदाज विशेष काही दाखवू शकले नाहीत.