सिडनी Australia Squad Announces : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचा पराभव केल्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ आता श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलिया या दौऱ्यावर 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे, जी केवळ औपचारिकता असेल कारण नुकत्याच झालेल्या मालिकेत भारताला पराभूत करुन, त्यांनी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप म्हणजेच WTC 2023-25 च्या अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे.
स्मिथवर संघाची जबाबदारी :आता WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. WTC चा अंतिम सामना 11 ते 15 जून दरम्यान लॉर्ड्सवर खेळवला जाईल. याआधी ऑस्ट्रेलियानं श्रीलंका दौऱ्यासाठी आपला संघ जाहीर केला आहे. या दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. त्यांचा नियमीत कर्णधार पॅट कमिन्स पितृत्व रजेवर असल्यानं स्टीव्ह स्मिथ श्रीलंकेविरुद्ध ऑस्ट्रेलियन संघाचं नेतृत्व करणार आहे.
हेझलवूड आणि मिचेस मार्शला संघात स्थान नाही :वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड दुखापतीतून सावरत आहे तर मिचेल मार्शला संघाबाहेर ठेवण्यात आलं आहे. या दोन्ही खेळाडूंचं लक्ष श्रीलंका दौऱ्यानंतर लगेच होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 वर आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर करण्याची अंतिम तारीख 12 जानेवारी आहे. आता या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन संघात कोणत्या खेळाडूंचा समावेश होतो हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.