गॉल 150 Runs in Asia : इथं सुरु असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरीनं इतिहास रचला. गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्यानं 156 धावांची शानदार खेळी केली. या खेळीसह, तो आता आशियामध्ये 150 किंवा त्याहून अधिक धावांची खेळी खेळणारा पहिलाच कांगारु यष्टीरक्षक बनला आहे.
कॅरी गिलख्रिस्टच्या क्लबमध्ये सामील : शुक्रवारी श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावून अॅलेक्स कॅरी आशियात कसोटी शतक झळकावणारा दुसरा ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक ठरला. क्रिकेटच्या सर्वात प्रदीर्घ स्वरुपात कॅरीचं हे दुसरं शतक होतं आणि डिसेंबर 2022 नंतरचं त्याचं पहिलं शतक होतं. त्यानं 118 चेंडूत शतक झळकावलं आणि आशियामध्ये चार शतकं झळकावणाऱ्या माजी दिग्गज यष्टीरक्षक-फलंदाज अॅडम गिलख्रिस्टच्या यादीत सामील झाला.
सर्वाधिक शतकं करणारा बिगर आशियाई खेळाडू :गिलख्रिस्टनं झळकावलेल्या चार शतकांपैकी त्यानं बांगलादेश आणि श्रीलंकेत प्रत्येकी एक शतक ठोकलं आहे, तर दोन शतकं भारतात ठोकली आहेत. आशियाई नसलेल्या खेळाडूनं सर्वाधिक शतकं झळकावण्याचा विक्रम झिम्बाब्वेच्या दिग्गज फलंदाज अँडी फ्लॉवरकडे आहे, ज्यानं आशियात पाच शतकं झळकावली आहेत.
कॅरीनं कर्णधार स्मिथसोबत केली भागिदारी :पहिल्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं फक्त 91 धावांत तीन विकेट गमावल्या असताना तो फलंदाजीला आला. येथून त्यानं कर्णधार स्टीव्ह स्मिथसोबत जबाबदारी स्वीकारली आणि चौथ्या विकेटसाठी 259 धावांची भागीदारी केली. यादरम्यान, स्मिथनं त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 36 वं शतक झळकावलं आणि 131 धावांची दमदार खेळी केली. या दोन्ही खेळाडूंमधील या भागीदारीच्या जोरावर, कांगारु संघानं श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या डावात आतापर्यंत 157 धावांची आघाडी घेतली आहे.
स्मिथनंही अॅलन बॉर्डर-पॉन्टिंगला टाकलं मागे : स्टीव्ह स्मिथनंही शतकी खेळीसह रिकी पॉन्टिंग आणि अॅलन बॉर्डर सारख्या दिग्गजांना मागे टाकलं आहे. तो आता आशियाई भूमीवर सर्वाधिक शतकं करणारा ऑस्ट्रेलियन खेळाडू बनला आहे. या खेळाडूनं आशियामध्ये खेळलेल्या 43 डावांमध्ये 7 शतकं केली आहेत. आशियामध्ये बॉर्डरनं 6 शतकं आणि पॉन्टिंगनं 5 शतकं झळकावली. स्टीव्ह स्मिथ आशियामध्ये सर्वाधिक धावा करणारा ऑस्ट्रेलियन खेळाडूही बनला आहे. त्यानं 1889 धावा करणाऱ्या रिकी पॉन्टिंगला मागे टाकलं.
हेही वाचा :
- अखेर ठरलं...! 'या' तारखेला सुरु होणार IPL 2025, लवकरच जाहीर होणार टाईम टेबल; BCCI चा मोठा निर्णय
- कांगारुंचे दोन फलंदाज यजमानांविरुद्ध डबल सेंच्युरी झळकावत इतिहास रचणार? पाहा लाईव्ह मॅच