मुंबई Akash Deep Record in Batting : न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय क्रिकेट संघानं ज्या प्रकारची कामगिरी दाखवली, त्याची अपेक्षा कोणीही केली नव्हती. ज्यात भारतीय संघाला तिन्ही सामन्यांमध्ये जवळपास एकतर्फी पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. मुंबईत खेळल्या गेलेल्या या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाला चौथ्या डावात तिसऱ्या दिवशी 147 धावांचं लक्ष्य मिळालं होतं, ज्यात संपूर्ण संघ केवळ 121 धावांवरच गारद झाला होता आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. या मालिकेत भारतीय संघानं अनेक लाजिरवाणे रेकॉर्ड केले असतानाच, वेगवान गोलंदाज आकाश दीपनं गोलंदाजीत नव्हे तर फलंदाजीत एक विश्वविक्रम केला, जो याआधी कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही खेळाडूला करता आला नव्हता.
एकाच सामन्यात गोल्डन आणि डायमंड डकवर आउट होणारा पहिला खेळाडू : एकाच सामन्यात गोल्डन डक आणि डायमंड डकवर आउट होणारा आकाश दीप आता 147 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे. या सामन्यात भारतीय संघाच्या पहिल्या डावात आकाश दीप फलंदाजीसाठी मैदानात आला तेव्हा तो एकही चेंडू न खेळता धावबाद झाला. दुसऱ्या डावात त्याला एक चेंडू खेळण्याची संधी मिळाली पण त्यावर तो बाद झाला. अशाप्रकारे तो पहिल्या डावात 'डायमंड डक'वर आऊट झाला तर दुसऱ्या डावात तो गोल्डन डकवर आऊट झाला. जेव्हा एखादा फलंदाज एकही चेंडू न खेळता आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परततो तेव्हा त्याला 'डायमंड डक' म्हणतात, तर जेव्हा एखादा फलंदाज त्याच्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद होतो तेव्हा त्याला 'गोल्डन डक' म्हणतात. अशाप्रकारे एकाच सामन्यात अशी कामगिरी करणारा आकाश दीप हा पहिलाच खेळाडू ठरला आहे.