मुंबई Sanjay Raut Criticized Government :मुंबईतील वरळी येथे हिट अँड रनची घटना घडलीय. या घटनेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेतील मुख्य आरोपी पालघरचे शिवसेनेचे (शिंदे गट) उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहिर शाह अद्यापही फरार आहे. या मुद्द्यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधतानाच, आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर काही गंभीर आरोप केलेत. मुख्य आरोपी मिहिर शाह आणि मुख्यमंत्र्यांचे घनिष्ठ संबंध असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. तसंच शाह त्यांच्या पक्षाचे उपनेते आहेत. म्हणून आरोपी अजूनही मोकाट असल्याचंही राऊत म्हणालेत.
आरोपीली गुजरातमध्ये लपवून ठेवले का : आरोपीच्या वडिलांना अटक झालीच कशी? पोलिसांनी त्यांना अटक करून गुन्हाच केला, अशी उपरोधिक टीका संजय राऊत यांनी सरकारवर केली. एका मराठी महिलेला मिहिर शाहनं दारूच्या नशेत चिरडून ठार मारलं, तिची हत्या केली. तरी पण हा आरोपी फरार आहे. हा आरोपी मुंबई पोलिसांच्या तावडीतून सुटतो कसा? त्याला कुठं लपवलय? या आरोपीला सुरतमध्ये लपवून ठेवलंय की, गुवाहाटीला लपूवन ठेवलं? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. याचा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावा. एका मराठी कुटुंबाला दिवसाढवळ्या रक्तबंबाळ करून ठार मारलं जातं. त्यामुळं या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित नाही, असंही ते म्हणाले.