मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून 20 उमेदवारांची दुसरी यादी रविवारी (27 ऑक्टोबर) रात्री जाहीर करण्यात आली. यात वरळी विधानसभा मतदारसंघातून मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं मिलिंद देवरा यांची लढत आता शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आदित्य ठाकरे यांच्याशी होणार आहे.
काय म्हणाले मिलिंद देवरा? :उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मिलिंद देवरा यांनी शिवसेनेचे आभार मानले. तसंच यासंदर्भात एक्सवर पोस्ट करत ते म्हणाले की, "वरळी, मुंबईतून महायुतीचा उमेदवार म्हणून मला उभं करण्याचा शिवसेनेचा निर्णय मला मान्य आहे. प्रत्येक वरळीकरांच्या आकांक्षा समजून घेऊन त्यांचा आवाज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन."
- वरळीत तिहेरी लढत :वरळी विधानसभा मतदारसंघातूनशिवसेनेकडून (उबाठा) आदित्य ठाकरे, तर महाराष्ट्र निवनिर्माण सेनेकडून संदीप देशपांडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यातच आता मिलिंद देवरा यांनाही शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. त्यामुळं वरळीत आता तिहेरी लढत पहायला मिळणार आहे.