नवी दिल्ली- लोकसभेचा रणंसग्राम सुरू होण्यापूर्वी मोदी सरकारकडून प्रचार आणि विकास कार्यक्रमाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय मंत्रिपरिषदेच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी लोकसभेच्या तोंडावर मंत्र्यांना मार्गदर्शन केले. तसेच काही महत्त्वाच्या सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंत्रिपरिषदेची बैठक ही सुषमा स्वराज भवनमध्ये पार पडली. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील ही मंत्रिपरिषदेची बैठक शेवटची मानली जाते.
सूत्राच्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीनंतर नवं सरकार स्थापन होताच त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी १०० दिवसांत तात्काळ पावले उचलण्यात येणार आहेत. त्यापूर्वी निवडणुकीत लोकांचे समर्थन मिळविण्याकरिता कामाला लागण्याच्या पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी मंत्रिपरिषदेच्या बैठकीत देशाचा विकास आणि सर्व समाजातील घटकांचे हित करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. आपण निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर पुन्हा भेटणार आहोत, असे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितलं. केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी रोडमॅपसाठी सूचना देण्याचं पंतप्रधान मोदींनी आवाहन केलं होतं. त्यानुसार काही मंत्र्यांनी बैठकीत काही सूचना सांगितल्या आहेत.
काय आहे विकसित भारताचा रोडमॅप-एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार विकसित भारतचा रोडमॅप तयार करण्यासाठी केंद्र सरकारची सर्व मंत्रालये, विविध राज्य सरकार, शैक्षणिक संस्था, उद्योग संघटना, विज्ञान संस्था यासह तरुणांकडून येणाऱ्या सूचना लक्षात घेण्यात आल्या आहेत. विकसित भारताच्या रोडमॅपसाठी विविध पातळ्यांवर २,७०० बैठका, कार्यशाळा आणि परिषद घेण्यात आल्या आहेत. तर २० लाख तरुणांच्या सूचना लक्षात घेण्यात आल्या आहेत. देशाचा विकास, जनतेची महत्त्वाकांक्षा, ध्येय, कृती यांची ब्ल्यूप्रिंट म्हणजे विकसित भारतचा रोडमॅप आहे. रोडमॅपमधील ध्येयामध्ये आर्थिक प्रगती, शाश्वत विकास, उद्योगानूकुलता, पायाभूत सुविधा आणि सामाजिक कल्याणाचा समावेश आहे.
लोकसभेची तयारी-लोकसभेच्या तोंडावर भाजपाकडून देशभरात 'संकल्प पत्र' अभियान राबविण्यात येत आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करण्यात येण्यासाठी कार्यक्रम घेण्यात येत आहेत. मुंबईतून २ लाख नागरिकांकडून सूचना घेण्यात येणार आहे. त्यामध्ये विकसित भारताबद्दलच्या नागरिकांकडून अपेक्षा जाणून घेण्यात येणार आहेत. ही मोहिम १५ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. यापूर्वीच पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवून सत्ता मिळविणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
हेही वाचा-
- विकसित भारत संकल्प पत्रासाठी मुंबईतून 2 लाख सूचना गोळा करणार- आशिष शेलार
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर घणाघात! दहा वर्षांपूर्वी फक्त घोटाळ्यांची चर्चा, आता फक्त विकास
- '2047 पर्यंत भारत विकसित देश होणार'; पंतप्रधान कार्यालयाच्या मुख्य सचिवांनी व्यक्त केला विश्वास