बीड: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाकडं राज्याचं लक्ष लागलं असून, याप्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी सर्वच आरोपींना अटक केली. त्यांच्यावर मोकोकांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात जाहीर केल्यानुसार आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, याप्रकरणात मास्टरमाईंड असल्याचा आरोप झालेल्या वाल्मिक कराडवर (Walmik karad) अद्यापही खुनाचा गुन्हा दाखल झाला नाही. पण, एसआयटीकडून आज वाल्मिक कराडवर देखील मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलीय. खंडणी प्रकरणात पोलीस कोठडी संपल्यानंतर वाल्मिक कराडला आज केज न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं त्यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे वाल्मिक कराडचा पाय खोलात गेला आहे.
वाल्मिक कराडवर मकोका प्रस्तावित: वाल्मिक कराडवर मकोका प्रस्तावित करण्यात आला आहे. मकोका लागू केल्यानंतर सीआयडी कोठडीची मागणी केली जाणार आहे. सरपंच संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराडवर हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मकोका अंतर्गत कारवाई होणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह, गावकऱ्यांनीही वाल्मिक कराडवर मकोका लावण्याची मागणी केली. मंगळवारी वाल्मिक कराडला केज न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर आता त्याच्यावर मकोका प्रस्तावित करण्यात आला, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. यावेळी त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
काय म्हणाले वकील सिद्धेश्वर ठोंबरे ? :"आज कोर्टापुढं युक्तीवाद झाला. त्यांनी 10 दिवसांची पोलीस कोठडी मागितली. त्यामध्ये त्यांनी 10 मुद्दे घेत त्याच 10 मुद्द्यांवर पोलीस कोठडी मागितली. त्यावर 31 डिसेंबरला 15 दिवसांची पोलीस कोठडी दिली. त्यापैकी पुन्हा तेच 10 मुद्दे सांगत त्यांनी इतर गुन्ह्यात तपास करायचा आहे, प्रॉपर्टी चेक करायची असं सांगितलं. त्यामुळं कोर्टानं आज दोन्ही सरकारी वकील आणि आमचा युक्तीवाद ऐकला आणि कोर्टानं त्यांचा पोलीस कोठडी मागण्याचा अर्ज फेटाळला आहे. तसंच न्यायालयीन कोठडी दिली आहे. आतापर्यंतच्या तपासात दुसऱ्या गुन्ह्यात तपास करायचा आहे, असं सांगण्यात आलं. मात्र तपासात कुठंही वाल्मिक कराडचा सहभाग आढळला नाही, हे आम्ही कोर्टाला सांगितलं आहे", असं वाल्मिक कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी सांगितलं.