मुंबई Vijay Wadettiwar : मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाने हाती घेतल्यानं विरोधकांकडून विरोध केला जातोय. देशातील विविध पायाभूत सुविधा आणि व्यवसायात आपली ओळख निर्माण करणाऱ्या अदानी समुहाला शाळा व्यवस्थापन सोपवण्याबाबत राज्य सरकारनं शासन निर्णय प्रसिद्ध केलाय. त्यामुळं महाविकास आघाडीतील नेत्यांनी सरकारवर टीका केली. शिंदे सरकारनं महाराष्ट्राचा 7/12 अदानींच्या नावावर करण्याचा निर्धार केल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर (Mahayuti) निशाणा साधला.
विरोधक आक्रमक :राज्यात महायुती सरकार (Mahayuti) आल्यापासून अनेक उद्योगधंदे गुजरातला गेले आहेत, असा आरोप विरोधक करत आहेत. राज्यातील धारावी या मोठ्या प्रकल्पाचं काम उद्योगपती गौतम अदानी यांना दिलंय. आता राज्यातील शाळा व्यवस्थापनाचं कामही अदानींनाच देण्यात आलंय. "आता राज्यातील सातबारा अदानींच्या नावे महायुती सरकारला करायचा आहे का?" असा संतप्त सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय. त्यांनी सोशल मीडियावरून एक पोस्ट करत हा संतप्त सवाल राज्य सरकारला विचारला.
काय म्हटलंय पोस्टमध्ये? : "महाराष्ट्राला महायुती सरकारएवढाच धोका अदानींचा देखील आहे. एअरपोर्ट, वीज, धारावी, मुंबईतील जमिनी झाल्या आता शाळांवरपण अदानींचा डोळा आहे. महायुती सरकारनं संपूर्ण महाराष्ट्राचा 7/12 च अदानी अँड कंपनीला द्यायचा ठरवला आहे का? शाळेच्या भिंतीवर आदरानं आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी लावलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांसोबत आता गौतम अदानी यांचा पण फोटो लावायची तयारी शिंदे, फडणवीस आणि अजित पवार सरकारकडून सुरू झाली आहे." अशी पोस्ट 'एक्स'वरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.