मुंबईUddhav Thackeray On PM Modi: मागील आठ दिवसात तिसऱ्यांदा काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी हल्ला केलाय. याला जबाबदार कोण? जरी केंद्रात तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार आलं असलं तरी काश्मीरमधील हल्ले काही थांबत नाहीत? काश्मीरमध्ये 370 कलम काढल्यानंतर सुद्धा लोकांचे जीव जात आहेत. याकडं केंद्र सरकार गांभीर्यानं का बघत नाही. त्यामुळं मोदींना पीएम पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मोदींवर (PM Narendra Modi) केलीय.
मोदी गांभीर्यानं घेणार का? :मणिपूर मुद्यावर एक वर्षानंतर सरसंघचालक मोहन भागवत बोलले हे काही कमी नाही. एक वर्षानंतरही मणिपूर अजून धुमसतंय. परंतु केंद्राकडून यावर कोणताच तोडगा काढला जात नाही. मात्र आता मोहन भागवत बोलल्यानंतर तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी गांभीर्यानं घेणार का? गृहमंत्री मणिपूरमध्ये जाणार का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित करत मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. तसंच देशातील मतदारांनी भाजपाला खडे बोल सुनावले आहे. लोकांनी तसंच मतदारांनी भाजपाला नाकारलं आहे. यामुळं आता तरी भाजपा सुधारणार आहे का? की केवळ विरोधकांना संपवणार आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपाला लगावला.
अनिल परब यांच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन : शिवसेना (ठाकरे गटाचे) मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अनिल परब यांच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन आज उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर पार पडलं. मागील 3 टर्म मी पदवीधर मतदारसंघातून काम करत आहे. पाच वेळा पदवीधर मतदारसंघात शिवसेनेचं वर्चस्व राहिलं आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून आम्हाला नेहमी चांगली मतं मिळाली आहेत. गेल्या वेळेस 98 टक्के मतं मिळाली होती. मी माझ्या मुंबई पदवीधर मतदारसंघात काय काम करणार याची माहिती या संकल्पपत्रात दिलीय, असं मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अनिल परब यांनी म्हटलं. यावेळी जाहीरनाम्याचं प्रकाशन झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केलाय.