मुंबई Uddhav Thackeray On Modi Government : शिवसेना प्रणीत स्थानिय लोकाधिकार समिती महासंघाचे सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त रविवारी (11 फेब्रुवारी) मुंबईतील प्रभादेवी येथे महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आलं होते. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकार, भाजपा आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
काय म्हणाले उध्दव ठाकरे :यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरे म्हणाले की,"शिवसेनेच्या (ठाकरे गट) इतिहासात मागील 56-57 वर्षात शिवसेनेनं अनेक वादळं अंगावर घेतली आहेत. परंतु शिवसेनेची मूळं एवढी जमिनीत खोल रुतली आहेत की, ती सहसा बाहेर काढता येणार नाहीत. ती मुळं जर तुम्ही उपटायला गेला तर, तुम्ही स्वतः मोडून पडाल. पण शिवसेनेची मूळं उपटणार नाहीत. त्यामुळं त्या भानगडीत पडू नका", अशी टीका उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर केली. भाजपाचं हिंदुत्व हे घर पेटवणार आहे. आमचं हिंदुत्व हे चूल पेटवणार आहे. हाताला काम...आणि तोंडात राम...असं आमचं हिंदुत्व आहे, अशी बोचरी टीकाही ठाकरेंनी भाजपावर केली.
भारतरत्न पुरस्कारावरुन केली टीका :पुढं ते म्हणाले की,"सध्या निवडणुकीचं वातावरण आहे. भारतरत्न पुरस्कार कोणाला द्यायचा? कधी द्यायचा? किती द्यायचा? याबद्दल आतापर्यंत एक सूत्र होतं. परंतु 'आले देवाच्या मना...तसे आले मोदींच्या मना…' लोकं हयात असताना पंतप्रधान मोदी आणि भाजपानं त्यांना पराकोटीचा विरोध केला. आता त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला जातोय. कर्पुरी ठाकूर यांनी बिहारमध्ये पहिल्यांदा 26 टक्के आरक्षण लागू केलं होतं. तेव्हा मंडल आयोग नव्हतं. मात्र, त्या आरक्षणाला त्यावेळी जनसंघानं विरोध केला होता. ठीक आहे उशिरा का होईना, त्या लोकांचं मोठेपण तुमच्या लक्षात येतंय", असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
बिहारमध्ये मतांसाठी पुरस्कार दिला :"भारतरत्न पुरस्कारांना माझा विरोध नाही आहे. पण कधी, कुठल्या वेळेला दिला हे महत्त्वाचं आहे. आता बिहारमध्ये माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न केंद्र सरकारने दिला आहे. परंतु बिहारमधील मतांवर डोळा ठेवून पुरस्कार जाहीर केल्याची टीका माजी मुख्यमंत्री ठाकरेंनी केंद्र सरकार आणि मोदींवर केली. स्वामीनाथन यांनी शेतकऱ्यांसाठी मोठं काम केलं. स्वामीनाथन यांनी देशात मोठी हरितक्रांती आणली. आपले युतीचे सरकार होतं, त्यावेळी त्यांना राष्ट्रपती करा ही आमची मागणी होती. तसंच आणखी निवडणुकीच्या तोंडावर अजून कुठल्या राज्यात भारतरत्न पुरस्कार जाहीर करतील, हे काय सांगता येत नाही, असा टोलाही त्यांनी मोदी सरकारला लगावला.
भाजपाकडे प्रचंड पैसा, भाडोत्री माणसं : सध्या सरकारकडून ओरबडण्याचे काम सुरू आहे. भाजपाकडे प्रचंड पैसा आहे. हा पैसा निवडणूक आणि प्रचारात वापरतात. भाजपाकडे करोड रुपये आणि भाडोत्री माणसं खूप आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपावर केली. आजच मी बातमी वाचली 2023-24 या वर्षात निवडणुकीवर 1300 कोटी रुपये भाजपाने खर्च केले आहेत. त्यांच्याकडे पैसा अमाप आहे. भाडोत्री माणसं कामाला लावून ते इतरांना फोन करत आहेत. मतं देणार का? असं फोनवर विचारतात. एक वेळ मी कुटुंबासह आत्महत्या करेन, पण भाजपा आणि मोदींना मतदान करणार नाही, अशी शेतकऱ्यांची आणि लोकांची संतप्त भावना आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.