नाशिक Sudhakar Badgujar Dismissal Notice : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी (8 मे) नाशिक दौऱ्यावर होते. मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना तडीपाडीची नोटीस बजावण्यात आली. सुधाकर बडगुजर यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर तडीपारीची नोटीस बजावण्यात आल्यानं शिवसेना ठाकरे गटामध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, बडगुजर यांनी ही तडीपारीची नोटीस अद्याप स्विकारली नसली तरी आपण याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचं बडगुजर यांनी सांगितलंय.
नेमकं काय आहे प्रकरण? :गेल्या काही वर्षांपूर्वी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता हा पॅरोलवर बाहेर आला होता. यावेळी शिवसेनेचे (सध्याचा ठाकरे गट) महानगर प्रमुख पदावर असलेले सुधाकर बडगुजर यांच्यासोबतचा कुत्ताचा डान्स करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुधाकर बडगुजर यांची चौकशी केली होती. बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. यावेळी ठाकरे गटाकडून उमेदवारी न मिळाल्यानं शिंदे गटात प्रवेश करणारे विजय करंजकर यांच्या समर्थकांनी सुधाकर बडगुजर यांनी कटकारस्थान केल्याचा आरोप केला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे मुंबईकडं रवाना झाले. तोवर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळं ठाकरे गटाकडून तीव्र नाराजी आणि संतापही व्यक्त केला जातोय.
...म्हणून बजावली नोटीस : "महायुतीचे उमेदवार हेमतं गोडसे यांचा पराभव डोळ्यासमोर दिसत असल्यानं सत्ताधाऱ्यांनी पोलिसांना हाताशी धरून उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. अशात मलादेखील तडीपारीची नोटीस देण्यात आली. मात्र, मी ती स्वीकारली नाही. तसंच मी यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे, " असे सुधाकर बडगुजर यांनी सांगितलं.