मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारानंतर छगन भुजबळ यांच्याशी यापूर्वी चर्चा झाली होती, त्यानंतर ते विदेशात होते. त्यांंच्याशी संवाद साधून दोन तीन दिवसात निर्णय होईल, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली. शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (एसपी) खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून राजकीय वक्तव्ये करुन आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं जात असलं तरी आतापर्यंत ते काय बोलले हे त्यांना माहीत आहे असा चिमटा भुजबळ यांनी काढला. राऊत आणि सुळेंकडून होणाऱ्या कौतुकाबद्दल त्यांनी आभार मानले. त्यांची ही बदलणारी भाषा पश्चात्तापाची आहे की राज्यातील जनतेने दिलेल्या निर्णयानंतरचा पश्चात्ताप आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपल्या सरकारवर त्यांचा कौतुकाचा ओघ कायम राहावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यात पक्षाचा एकही आमदार नाही: सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेला आमदार शिवाजी गर्जे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार सना मलिक, माजी खासदार आनंद परांजपे, प्रवक्ते संजय तटकरे, सूरज चव्हाण उपस्थित होते. पक्षाच्या विविध विभागाच्या आढावा बैठका शुक्रवारी मुंबईत प्रदेश कार्यालयात घेण्यात आल्या. या बैठकांना तटकरे तसंच खासदार सुनेत्रा पवार देखील उपस्थित होत्या. राज्यात काही जिल्ह्यात पक्षाचा एकही आमदार नाही, काही ठिकाणी एक आमदार आहे. त्यामुळे पक्षाला राज्यभरात अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती तटकरेंनी दिली.
प्रतिक्रिया देताना सुनील तटकरे (ETV Bharat Reporter)
संभाजीनगरात पक्षाचे दोन दिवसीय शिबिर : 18 आणि 19 जानेवारीला छत्रपती संभाजीनगर येथे पक्षाच्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन पुढील पाच वर्षांचा रोडमॅप तयार करणार आहोत. सभासद नोंदणी मोहीम सुरू करुन पक्षाला अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पक्षाची शिस्त कसोशीने पाळली जाईल याची दक्षता घेण्याची सूचना केल्याचं त्यांनी सांगितलं. प्रवक्त्यांचं मत हे पक्षाचं मत असल्यानं प्रवक्त्यांची स्वतंत्र बैठक घेऊन प्रवक्त्यांना सूचना करण्यात आल्याची माहिती तटकरे यांनी दिली.
पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार :राज्यातील विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा आहे. त्यामुळे त्याबाबत पुढील दोन तीन दिवसात बैठक होऊन निर्णय होईल. मंत्रिमंडळात आमचे 10 मंत्री आहेत. त्यामुळं किती पालकमंत्री पदे मिळतील त्यानंतर कोणाला कोणत्या जिल्ह्यात संधी द्यायची याचा निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
बजरंग सोनावणेंनी बेछूट आरोप करु नयेत: खासदार बजरंग सोनावणे हे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी जबाबदारीनं बोलायला शिकावं, असा टोला तटकरेंनी लगावला. नेत्यांच्या ताफ्यात बाहेरच्या गाड्या असण्याबाबत नेत्यांना माहिती नसतं, असा खुलासाही त्यांनी केला. अजित पवारांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी असल्याचा आरोप सोनावणेंनी केला होता. त्यावर बोलताना सोनावणेंनी बेछूट आरोप करु नयेत, गाडी क्रमांक सांगावा असं आव्हान त्यांनी दिलं.
आरोपींना शिक्षा व्हावी :संतोष देशमुख हत्याप्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळं याबाबत कुठलेही राजकीय मत व्यक्त करणार नाही. सरकारनं एसआयटी, सीआयडी आणि न्यायालयीन चौकशी सुरू केलीय, या प्रकरणाची फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी व्हावी आणि आरोपींना शिक्षा व्हावी ही पक्षाची भूमिका असल्याचं तटकरे म्हणाले.
नेत्यांच्या प्रवेशाबाबत माहिती नाही :राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदार आणि नेत्यांच्या प्रवेशाबाबत कुणाचा कुणाशी संवाद सुरू आहे याची फारशी माहिती आपल्याला नाही, असं तटकरे म्हणाले. एनडीएमध्ये सहभागी होण्याच्या निर्णयावर जनतेने शिक्कामोर्तब केलं आहे. आम्ही आता महायुती सरकारमध्ये सहभागी आहोत, केंद्रात एनडीएमध्ये आहोत. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. ज्यांना भूमिका घ्यायची ते भूमिका घेतील असं उत्तर त्यांनी दिलं. ज्यांना यायचं आहे त्याबाबत मी सध्या जास्त काही बोलू शकत नाही. उत्तम जानकर आजपर्यंत अनेकदा पराभूत झाले. यावेळी विजयी झाल्यानं ते विजयाच्या प्रभावातून बाहेर आलेले नाहीत, असा टोला त्यांनी जानकरांना लगावला.
'लाडकी बहीण योजने'चे निकष बदलले नाहीत : 'लाडकी बहीण योजने'चे कोणतेही निकष बदललेले नाहीत. मात्र त्या निकषांची छाननी होईल, असं मी संबंधित खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितल्याचं ऐकल्याचं ते म्हणाले. याबाबत मंत्री आणि मुख्यमंत्री बोलतील असं त्यांनी स्पष्ट केलं. निवडणूक काळात आम्ही जे आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या योजनेमुळं राज्यातील महिलांची पूर्ण साथ मिळाली त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. अजित पवारांच्या मातोश्रींनी केलेलं विधान दोन्ही कुटुंबं एकत्र येण्याबाबत आहे, याचा पुनरुच्चार तटकरे यांनी केला.
हेही वाचा -
- 'आदिती तटकरे यांच्या बापाच्या पापामुळं माझं मताधिक्य घटलं’, आमदार महेंद्र थोरवे यांची टीका
- "यांच्याकडे आपण लक्ष देत नाही...", शिंदेंच्या आमदाराला अजित पवारांनी एका वाक्यात दिलं उत्तर
- "दादा इज ग्रेट हे सिद्ध झालंय", अजित पवारांच्या 'त्या' विधानावर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया