मुंबई Sudhir Mungantiwar On MVA : भाजपाचे जेष्ठ नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी (17 मार्च) मुंबईत पार पडलेल्या इंडिया आघाडीच्या सभेवरून काँग्रेस तसंच विरोधकांवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. अदानीला मोठं करण्याचं काम कोणी केलं?, असा खोचक सवाल मुनगंटीवार यांनी मविआ ला केला. तसंच राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवार मोदी चले जाव म्हणताय. मात्र, याचा अर्थ मोदी चले आओ, असा होतो, असा टोलाही त्यांनी लगावला.
स्वतः अदानीच्या पाठीशी उभं राहायचं, पण बदनामी आमची करायची : काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार उद्योगपती अदानी यांच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीका करत आहेत. त्यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "विरोधकांना देवानं कमी स्मरणशक्ती दिलीय, किंवा हे विरोधक आपल्या सोयीचं राजकारण करताय. लोकसभेत सुद्धा अदानी यांचं नाव घेऊन मोदींवर टीका करण्याचं काम विरोधक करत आहेत. यांनी अदानींचा इतिहास कधी बघितलाय का? 1993 मध्ये काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांनी अदानीला 10 पैसे मीटरनं कच्छची जमीन देऊन मदत केली. गुजरातचे माजी मुख्यमंत्री छबिलदास मेहता जे शरद पवार चे अतिशय घनिष्ठ मित्र होते. ते 1995 मध्ये मुख्यमंत्री झाले. त्यांनी मुद्रापूर टेंडर तेव्हा काढले."
अदानी आणि तुमची घनिष्ठ मैत्री :पुढं ते म्हणाले की, "जेव्हा राजस्थान मध्ये काँग्रेसचे सरकार होतं तेव्हा अदानीला 45 हजार कोटींचं सोलारचं टेंडर देण्यात आलं. त्यावर काही प्रश्न नाही. महाराष्ट्रात 2 वर्ष 8 महिने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे एक अभद्र सरकार होतं. तेव्हा एमएसईबी मधून काँग्रेसच्या ऊर्जा मंत्र्यांनी हजारो कोटी रुपये दिले. तेव्हा अदानी हा मोदीजींचा मित्र नव्हता, तर तो तुमचा घनिष्ठ मित्र होता. म्हणजे दिवसा सभेमध्ये अदानीचं नाव घ्यायचं आणि रात्री अदानी सोबत गप्पागोष्टी करत भोजन करायचं, ही तुमची अतिशय वाईट निती आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये जर काही चुका असतील तर त्या चुका काढल्याच पाहिजेत, यामध्ये काही दुमत नाही. पण स्वतः अदानीच्या पाठीशी उभा रहायचं आणि भाषणामध्ये अदानीच्या नावाचा शिमगा करत सत्तेची स्वप्न पाहायची. सत्तेच्या पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करायचा. जरा इतिहास काढा, अदानीला मोठं करण्याचं काम कोणाच्या राज्यात झालंय हे इतिहासामध्ये शब्द न शब्द फाईल मध्ये लिहिलेलं आहे."