मुंबई - मराठी मनोरंजनसृष्टीत जेष्ठ कलाकारांना खूप मान दिला जातो. हल्ली त्यांच्याभोवती फिरणारी कथानकं चित्रपटांतून सादर केली जातात. अशोक सराफ आणि वंदना गुप्ते हे दोन दिग्गज कलाकार एका सिनेमातून एकत्र येत आहेत. या चित्रपटाचे नाव अजून ठरलेलं नाही. या चित्रपटाची निर्मिती, चित्रपती व्ही शांताराम यांचे नातू आणि किरण शांताराम यांचे चिरंजीव राहुल शांताराम 'राजकमल एंटरटेनमेंट'च्या बॅनर खाली करीत असून लेखन आणि दिग्दर्शन लोकेश गुप्ते यांनी केलं आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आणि गुणी अभिनेत्री वंदना गुप्ते यांना रुपेरी पडद्यावर एकत्र पाहण्याची संधी रसिकांना लवकरच मिळणार आहे. नव्या वर्षात प्रेक्षकांना मनोरंजनाचा एक नवा अध्याय अनुभवायला मिळणार आहे.
राहुल शांताराम यांनी आपले आजोबा, व्ही शांताराम, यांच्यापासून प्रेरणा घेऊन ‘राजकमल एंटरटेनमेंट’ या प्रॉडक्शन हाऊसची स्थापना केली आहे, ज्याचा उद्देश दर्जेदार आणि मनोरंजक सिनेमे सादर करणं हा आहे. अशोक सराफ यांनी सांगितलं की, “दीर्घ काळानंतर मला अशी भूमिका मिळाली आहे, जी माझ्या मनाप्रमाणे आहे. या चित्रपटाची कथा काळानुरूप असून, दिग्दर्शक लोकेश गुप्तेनं ती अप्रतिमरीत्या प्रेझेंट केली आहे. वंदना गुप्तेबरोबर पुन्हा काम करताना नेहमीप्रमाणे मजा आली. आमचं टायमिंग नेहमीच सुंदर जुळतं आणि यावेळीही तसंच झालंय त्यामुळे प्रेक्षकांना डबल मजा येईल."
वंदना गुप्ते यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितलं की, “'राजकमल एंटरटेनमेंट'बरोबर काम करण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी मोठी आनंदाची बाब आहे. अशोक सराफसारख्या प्रतिभावंत अभिनेत्याबरोबर काम करण्याचा अनुभव प्रत्येकवेळी प्रेरणादायी ठरतो. लोकेश गुप्ते यांची कथा आणि दिग्दर्शन अतिशय प्रभावी आहे.” दिग्दर्शक लोकेश गुप्ते यांनी या चित्रपटाच्या अनुभवाबद्दल सांगितलं की, “अशोक सराफ आणि वंदना गुप्तेसारख्या ज्येष्ठ कलाकारांबरोबर काम करणं माझ्यासाठी खूप खास होतं. त्यांच्या अनुभवाचा लाभ मिळवणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट होती. राहुल शांताराम यांचा पाठिंबा आणि प्रोत्साहन यामुळं हा प्रकल्प शक्य झाला.”
'राजकमल एंटरटेनमेंट'चा हा बहुप्रतिक्षित चित्रपट १० एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.