शिर्डी : कोपरगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आशुतोष काळे विद्यमान आमदार असल्यानं, ही जागा पवार गटाला सुटणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याचं मानलं जातय. दुसरीकडं भाजपा पक्षाचे विवेक कोल्हे हे देखील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून इच्छुक आहेत. भाजपाने कोल्हेंना उमेदवारी दिल्यास त्यांना पर्यायी पक्षात जावं लागेल तशी तयारी त्यांनी केलीय.
कोल्हे आणि फडणवीस यांच्यात एक तास चर्चा : विवेक कोल्हे यांनी मध्यंतरी शरद पवारांची भेट घेतल्यानं ते राष्ट्रवादी किंवा उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळं ते महायुतीला अडचणीचं ठरु शकतं. त्यामुळं कोल्हेंची मनधरणी करण्याचा भाजपाकडून प्रयत्न केला जातोय. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांना तडकाफडकी भेटीचं निमंत्रण देण्यात आलं. मुंबईत स्नेहलता कोल्हे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एक तास चर्चा झाल्याची माहिती आहे.
विखेंचा दारुण पराभव : नगर जिल्ह्यात 2019 च्या निवडणुकीत विद्यमान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोपरगाव विधानसभा निवडणुकीत त्यांचे मेव्हणे राजेश परजणे यांना उभे केल्यानं स्नेहलता कोल्हे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर कोल्हे आणि विखे यांच्यातील राजकीय संघर्ष तीव्र झाला होता. त्याचा बदला विवेक कोल्हे यांनी गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत घेतला होता. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्याशी युती करत विखेंचा दारुण पराभव केला होता. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटी कोपरगावात फडणवीसांनी कोल्हेंची भेट घेतल्यानंतर ते सक्रिय झाल्याचं दिसून आलं. मध्यंतरी शिक्षक मतदारसंघात देखील विवेक कोल्हे यांनी पक्षविरोधी जावून अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. मात्र, तिथेही त्यांचा पराभव झाल्यानंतर विवेक कोल्हेंनी कोपरगाव आणि शिर्डी मतदारसंघातून ही निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली होती.
कोल्हे बंडखोरी करण्याची शक्यता : काही दिवसांपूर्वीच स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे यांनी शरद पवारांसोबत एकाच गाडीतून प्रवास केल्यानं ते शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत होत्या. आता विधानसभा निवडूक जाहीर झाल्यानं राजकीय घडामोडींना वेग आला. त्यातच स्नेहलता कोल्हे यांनी फडणवीस यांची मुंबई भेट घेतली आहे. त्यानंतर आता भाजपातून कोल्हे यांना योग्य शब्द न मिळाल्यास कोल्हे बंडखोरी करण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -
- कोपरगाव गोळीबार प्रकरणी अजित पवार गटाच्या आमदाराची चौकशी करा, भाजपाची मागणी - Kopargaon Firing Case
- राज्यात सत्ता दिली तर जुनी पेन्शन योजना लागू करणार, उद्धव ठाकरेंचं जनता जनार्दनाला आश्वासन - Uddhav Thackeray In Shirdi
- पाण्यासाठी शेतकऱ्यांचं संगमनेर-कोपरगाव महामार्गावर चक्का जाम आंदोलन - Farmer Protest