महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

सामाजिक चळवळीची पार्श्वभूमी असलेल्या स्नेहा दुबे निवडणुकीच्या रिंगणात; आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याशी होणार लढत - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

वसई विधानसभा मतदारसंघात यंदा तीन नेत्यांमध्ये मुख्य लढत होणार आहे. स्नेहा दुबे आणि विजय पाटील या दोन्ही नेत्यांपुढे हितेंद्र ठाकूर यांचं मोठं आव्हान असणार आहे.

Vasai Assembly election
स्नेहा दुबे-पंडित निवडणुकीच्या रिंगणात (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 14, 2024, 10:44 PM IST

पालघर :पालघर जिल्ह्यातील वसई विधानसभा मतदारसंघातून यावेळी भारतीय जनता पक्षाने सामाजिक चळवळीत मोठं योगदान असलेल्या स्नेहा दुबे-पंडित यांना उमेदवारी दिली. दहा वर्षांपूर्वीच्या निवडणुकीतील वडिलांच्या पराभवाची परतफेड करण्यासाठी त्या मोठ्या जिद्दीनं निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.

स्नेहा दुबे-पंडित निवडणुकीच्या रिंगणात :वसई विधानसभा मतदारसंघातून २००९ मध्ये विवेक पंडित अपक्ष म्हणून निवडून आले होते. परंतु, २०१४ च्या निवडणुकीत आमदार हितेंद्र ठाकूर यांनी त्यांचा पराभव केला. आता दहा वर्षानंतर विवेक पंडित यांच्या कन्या स्नेहा दुबे-पंडित यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली. वडिलांच्या झालेल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी त्या निवडणुकीत मोठ्या हिमतीनं उतरल्या आहेत.



बालपणीच सामाजिक कामाची दीक्षा : स्नेहा पंडित-दुबे या आपले वडील विवेक पंडित यांच्या पावलावर पाऊल ठेवून लहानपणीच सामाजिक क्षेत्रात कार्यरत झाल्या. उच्च शिक्षण घेत त्यांनी वकिलीची सनद घेतली. न्यायाधीश पॅनलची सदस्य, विधायक संसद सचिव आदी पदे भूषवून २०१७ मध्ये त्यांनी श्रमजीवी संघटनेच्या कार्याध्यक्ष म्हणून कामाला सुरुवात केली. घरातूनच सामाजिक कार्याचे बाळकडू मिळाल्यामुळं समाजातील दीनदुबळ्या, दलित, आदिवासी, पीडित आदी घटकांचे प्रश्न मार्गी लावण्यात त्यांनी पुढाकार घेतला. गोरगरीब, कष्टकरी, कामगार, आदिवासी वंचित बंधू-भगिनीवर झालेल्या अन्यायाविरुद्ध त्या सातत्याने उभ्या राहिल्या. त्यांना न्याय मिळवून दिला.



दुर्गम भागात महिला बचत गटाची चळवळ : वाडा, विक्रमगडसारख्या दुर्गम भागात महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी महिला बचत गट चळवळ सुरू केली. त्यातून महिलांना रोजगार मिळवून दिला. वृक्ष संवर्धनाचे महत्त्व जाणून तीन लाख वृक्षांची लागवड करून ते जगवून दाखवले. जव्हार, मोखाडा यासारख्या दुर्गम भागात कुपोषण निर्मूलनांतर्गत बालकांचा मृत्यू दर कमी करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न यशस्वी झाले. ठाणे, पालघर, नाशिक, रायगड जिल्ह्यातील नागरिकांसाठी विविध योजनांचे प्रशिक्षण तसेच संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे प्रशिक्षण देऊन महिलांचे राजकीय नेतृत्व उभे करण्यात त्यांचा मोठा पुढाकार आहे.



राजकीय नेतृत्व घडवण्यात योगदान: हजारो महिलांना पंचायत राज प्रशिक्षण देऊन त्यांचे राजकीय नेतृत्व घडवण्यात स्नेहा दुबे पंडित यांचे मोठे योगदान आहे. महिलांच्या सन्मानासाठी त्यांनी आई सन्मान योजना सुरू केली. त्याची सुरुवात स्वतःपासून केली. मुलांच्या नावापुढे आईचे नाव नोंदवून त्याचा लढा सुरू केला. या लढ्याची दखल राज्यातील महायुतीच्या सरकारनं घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्र्यांनी आपल्या वडिलांच्या नावाआधी आईचे नाव लावण्याचा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करून घेतला.


सत्तरहून अधिक सरंपचांना प्रशिक्षण :पालघर आणि ठाणे जिल्ह्यात ७० पेक्षा जास्त महिला सरपंच स्नेहा दुबे पंडित यांच्या नेतृत्वाखाली महिला सक्षमीकरण प्रशिक्षण घेऊन तयार झाल्या आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेऊनच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने वसई विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. ‘वसईचा विकास हेच आपले ध्येय’ हे ब्रीदवाक्य घेऊन त्या निवडणुकीत प्रचारात उतरल्या असताना भूतकाळातील भुते पुन्हा उतरून काढायची नाहीत आणि वसईचा विकास हा राज्याच्या नजरेत भरेल, असा करायचा या आश्वासनावर त्यांनी आपला प्रचारावर लक्ष केंद्रित केलं आहे.

हेही वाचा -

  1. "राहुल गांधींच्या तोंडून हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे..."; पंतप्रधान मोदींचं उद्धव ठाकरेंना चॅलेंज, 'एक है तो सेफ है'चा दिला नारा
  2. पोस्टरवर मोदींच्या फोटोची गरज नाही; निवडणुकीत केवळ विजय महत्त्वाचा, भाजपा प्रवक्त्याची स्पष्टोक्ती
  3. VIDEO : नाशिकमध्ये राडा, खासदार सुप्रिया सुळे थेट पोलीस आयुक्तांच्या भेटीला, म्हणाल्या, "केसालाही धक्का..."

ABOUT THE AUTHOR

...view details