पुणे Shirur Lok Sabha Constituency : शिरुर मतदारसंघाच्या जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. हडपसर मतदार संघातून कमीत कमी एक लाख मतांचा लीड मला मिळणार असल्याचा विश्वास शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) उमेदवार आढळराव पाटील यांनी व्यक्त केलाय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीच्या निमित्तानं पुण्यातील पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. यावेळी ते बोलत होते.
अमोल कोल्हेंवर टीका : जिल्ह्यातील अनेक भागात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. खासगी टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. याबाबत आढळराव पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, "गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यानं पाण्याची जास्त पाणीटंचाई निर्माण झालीय. आमच्या काही संस्था तसंच काही स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय. डॉ. अमोल कोल्हे यांनी जुन्नर तालुक्यातील कोपरे मांडव हे गाव दत्तक घेतलं होतं. त्या गावात आमच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चानं पाण्याचे टँकर सुरू केले आहेत. त्यांना स्वतःच काहीही दिसत नाही. स्वतःचा तालुक्यातील त्यांनी घेतलेल्या दत्तक गावात काही नाही. ते राज्याचं काय सांगत आहेत?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत अमोल कोल्हेंवर टीका केलीय.