मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा (Uddhav Thackeray Dasara Melava) दादरमधील शिवाजी पार्कवर पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. "शिवसेना म्हणजे वाघनखं आहेत, दिल्लीकरांच्या कितीही पिढ्या आल्या तरी आम्ही त्यांना गाडून टाकू. मला आणि शिवसेनेला नेस्तानभूत करायचं हे त्यांनी ठरवलंय. जनतेचं पाठबळ नसतं, तर मी उभा राहू शकलो नसतो," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपासह शिंदेंवर प्रहार केला.
भाजपाचं बुरसटलेलं हिंदुत्व :भाजपाचं हिंदुत्व हे गोमूत्रधारी बुरसटलेलं हिंदुत्व असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर हल्लाबोल केला. भाजपाशी लढतोय हे बरोबर की चूक? मिंधेंचा विचार हा बाळासाहेबांचा विचार नसल्याचंही ठाकरे म्हणाले. अदानी आमची जान, आम्ही शेठजींचे श्वान, असं मिंधेंनी लिहायला पाहिजे. मला कुत्रे आवडतात, लांडगे नाही, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.
मतांसाठी महाराजांचा पुतळा उभारला : "छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. भाजपानं मतांसाठी महाराजांचा पुतळा उभारला. त्यातही त्यांनी पैसे खाल्ले, सरकार आल्यावर आम्ही प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार आहोत," अशी घोषणाही उद्धव ठाकरेंनी केली.
अमित शाहांवर हल्लाबोल : "शकुनी मामा कोण तुम्हाला माहीत आहेच," असं म्हणत ठाकरेंनी नाव न घेता अमित शाहांवर हल्लाबोल केला. "कौरवांची वृत्ती तीच यांची वृत्ती. फक्त भाजपा शिल्लक राहावी हीच यांची नीती," असं म्हणत भाजपावर टीकास्त्र डागलं. "महाराष्ट्रात यांना खांद्यावर घेऊन फिरवलं हे आमचं पाप आहे. पण आता यांना आम्ही खांदा देणार. ज्यांना मी मोठं केलं, तेच आज माझ्यावर वार करत आहेत. आपल्यावर चालून येणाऱ्यांचा राजकीय शिरच्छेद केला पाहिजे. शिवाजी महाराजांनी सुद्धा राक्षस मारले, अफजल खानसुद्धा राक्षसच होता," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली.