मुंबई Lok Sabha Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष पूर्वतयारीला लागले आहे. देशात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते. त्यामुळं सध्या देशभरासह राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. असे असतानाच आता लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणीत ठाकरे गटानं आघाडी घेतली आहे ठाकरे गटानं लोकसभा निवडणूक समन्वयक जाहीर केले आहेत.
18 मतदारसंघावर दावा करण्याचे संकेत ? : सत्ताधारी महायुतीत आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडीत जागा वाटपात अद्यापही एक मत झालेलं नाही. तसंच विरोधी पक्षातील पक्षांमधून सत्ताधारी पक्षांमध्ये जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र, हे सुरू असताना दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणूक समन्वयक जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळं ठाकरे गटानं राज्यातील 18 मतदारसंघांमध्ये समन्वयक नेमून लोकसभा मतदारसंघ जाहीर केल्याचे संकेत दिल्याचं बोललं जातंय. या समन्वयकांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
लोकसभा समन्वयकांमध्ये अनेक नवख्या चेहऱ्यांना संधी :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं अटक करण्यात आलेले मुंबईचे माजी महापौर आणि ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी यांच्यावर ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर आमदार विलास पोतनीस यांच्यावर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाची आणि माजी आमदार संजय कदम यांच्यावर रायगड लोकसभा मतदार संघाची जबाबदारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं लोकसभा निवडणूक समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकसभा समन्वयक पुढीलप्रमाणे :
- जळगाव : सुनील छबुलाल पाटील
- बुलढाणा : राहुल चव्हाण
- रामटेक : प्रकाश वाघ,
- यवतमाळ : वाशीम - उद्धव कदम
- हिंगोली : संजय कच्छवे
- परभणी : शिवाजी चोथे, संतोष सांबरे
- जालना : राजू पाटील
- संभाजीनगर : प्रदीपकुमार खोपडे
- नाशिक : सुरेश राणे
- ठाणे : किशोर पोतदार, सुभाष म्हसकर
- मुंबई उत्तर पश्चिम : विलास पोतनीस
- मुंबई उत्तर पूर्व ( ईशान्य) दत्ता दळवी
- मुंबई दक्षिण मध्य : रवींद्र मिर्लेकर
- मुंबई दक्षिण : सुधीर साळवी, सत्यवान उभे
- रायगड : संजय कदम
- मावळ : केसरीनाथ पाटील
- धाराशीव : स्वप्नील कुंजीर
- कोल्हापूर : सुनील वामन पाटील