पुणे Ajit Pawar vs Amol Kolhe : शिरुर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात रंगत आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीचे उमेदवाराचा प्रचार करताना शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांना चांगलाच टोला लगावला. शिरुर लोकसभेच्या प्रचारासाठी मंमदवाडी भागातील जाहीर सभेत उपमुख्यमंत्री पवार यांनी अमोल कोल्हे यांचा चांगलाच समाचार घेतला. यानंतर अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.
नटसम्राट पाहिजे की कार्यसम्राट :मंमदवाडी भागातील जाहीर सभेत बोलताना अजित पवार म्हणाले होते, "तुम्हाला नटसम्राट खासदार पाहिजे की कार्यसम्राट खासदार पाहिजे, याचा विचार करा. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी मी खूप फिरलो. त्यांच्यासाठी काम केलं. ते खासदार म्हणून निवडून आले. पण दोनच वर्षांनी ते माझ्याकडे आले. खासदारकी माझं काम नाही, असे मला म्हणाले. मला राजीनामा द्यायचं असून अभिनय हा माझा व्यवसाय आहे. त्यावेळेस मी म्हणालो अरे बाबा थोडं थांब. तुला निवडून दिलेलं आहे. आता ही पाच वर्षे पूर्ण कर. ते म्हणालेसुद्धा मी पुन्हा थांबणार नाही. त्यामुळं तुम्हाला नटसम्राट खासदार हवा का कार्यसम्राट याचा विचार करा."
कार्यसम्राट की नटसम्राट माहीत नाही, पण स्वकर्तृत्वसम्राट : शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलंय. खासदार कोल्हे यांनी केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "कार्यसम्राट की नटसम्राट माहीत नाही. पण स्वकर्तृत्वसम्राट नक्की! 2001 साली "सांगा उत्तर सांगा" या कार्यक्रमाचा निवेदक म्हणून या वास्तूच्या पायऱ्या चढलो ते माझे ‘काका’ अभिनय क्षेत्रात नव्हते. तर स्वतःच्या टॅलेंट आणि कर्तृत्वाच्या जोरावर आणि योगायोगानं आज 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या राजकीय पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी याच वास्तूच्या पायऱ्या चढलो. ते ही काकांच्या नाही तर ‘स्व’कर्तृत्वाच्या जोरावर पायऱ्या चढलो."