महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

बाप तो बाप रहेगा...! राजकारणात पुन्हा एकदा शरद पवार पुतणे अजित पवारांवर वरचढ - Pawar vs Pawar - PAWAR VS PAWAR

Pawar vs Pawar : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आठ जागांवर विजय मिळवला तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकच जागा मिळाली. त्यामुळं राजकारणात पुन्हा एकदा शरद पवार हे पुतणे अजित पवार यांच्यावर वरचढ झाल्याचं पाहायला मिळालंय.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र (Etv Bharat MH Desk)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 10, 2024, 5:48 PM IST

मुंबई Pawar vs Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करुन शरद पवार नेहमीच केंद्र आणि राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी राहिले आहेत. जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी महायुती सोबत जाणं पसंत केलं. मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आठ जागा मिळवल्या तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकच जागा मिळाली. त्यामुळं राजकारणात शरद पवार पुन्हा एकदा पुतणे अजित पवार यांच्यापेक्षा वरचढ झाले.


महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी : महाराष्ट्रातील राजकारणात 38व्या यावर्षी राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याचा बहुमान शरद पवार यांच्या नावावर आहे. पन्नास वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत शरद पवार यांनी अनेक चढउतार अनुभवले आहेत. गेल्यावर्षी जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार यांचा पक्ष आणि राजकारण संपल्याचं बोललं जात होतं. मात्र, शरद पवार नव्या जोमानं उभे राहिले आणि नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा आपणच राजकीय गुरू असल्याचं दाखवून दिलं. 2014 साली मोदी लाट आणि 2019 साली पुन्हा एकदा मोदी करिश्म्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसला होता. 2019 साली शरद पवार यांचा पक्ष संपला असं देखील बोललं जात होतं. मात्र विधानसभेचे निकाल येताच, शरद पवारांनी राजकीय खेळी करत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांना एकत्र आणून महाविकास आघाडी स्थापन करुन राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आणून एक वेगळा संदेश देशातील राजकारण्यांना दिला.


लोकसभा निवडणुकीत वरचढ : गेल्यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकामेकांविरोधात लोकसभा निवडणुकीत उभे ठाकले. महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरद पवार यांनी राज्यात दहा ठिकाणी उमेदवार उभे करुन त्यातील आठ ठिकाणी विजय संपादन केला तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसनं चार ठिकाणी उमेदवार देऊन एक जागा निवडून आणण्यात अजित पवार यांना यश आलं. सगळ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव करत बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवारच चालणार हे दाखवून दिलंय. त्यामुळं शरद पवार पुतण्यावर भारी पडल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

अजित पवार परत फिरण्याचा विचार करु शकतात : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दहा पैकी आठ जागा निवडून आणत महाविकास आघाडीत शरद पवार यांनी स्वाभिमान जपलाय. महायुतीत एक जागा जिंकून आल्यामुळं अजित पवार यांनी मानाचं स्थान देखील गमावल्याचं चित्र आहे. त्यामुळं निश्चितच राजकारणात शरद पवार हे अजित पवार यांच्यापेक्षा सरस ठरले आहेत. आपण घेतलेल्या निर्णयाबाबत अजित पवारांच्या मनात चलबिचल सुरू असेल. कारण त्या निर्णयाचा फायदा त्यांच्या स्वतःच्या पक्षाला झाला नाही की महायुतीला झाला नाही. त्यामुळं त्यांच्यासोबतचे आमदार अस्वस्थ असून टप्प्याटप्प्यानं शरद पवारांकडे जाऊ शकतात असा अंदाज हेमंत देसाई यांनी व्यक्त केलाय. तसंच येत्या काळामध्ये आपली कोंडी होऊन नितीशकुमार होऊ नये म्हणून आपलं घर नेमकं कुठं याचा विचार करुनच अजित पवार येत्या काळात परत फिरण्याचा निर्णय घेऊ शकतात, असं मत राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी म्हटलंय.



अजित पवारांची तारेवरची कसरत : महायुतीतील घटक पक्षांच्या कामगिरीचा जर विचार केला तर अजित पवार यांच्या पक्षाची कामगिरी अतिशय वाईट झालीय. तर महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कामगिरी सर्वोत्कृष्ट झालीय. आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीचा निकाल परिणाम परिणामकारक ठरणार आहे. त्यामुळं अजित पवार यांना महायुतीत राहून आपलं अस्तित्व सिद्ध करणं आणि पक्षाला एकजूट ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.



हेही वाचा :

  1. "गेल्या पाच वर्षांत एक-दोन व्यक्तींनीच सरकार चालवलं"- शरद पवार
  2. राष्ट्रवादीचा 25 वा वर्धापन दिन; काँग्रेसमध्ये बंडखोरी करुन बाहेर पडलेले शरद पवार आता पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार का?

ABOUT THE AUTHOR

...view details