पुणे Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे, पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज (18 एप्रिल) आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर महाविकास आघाडीची सभा पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते.
शरद पवारांची मोदी सरकारवर टीका : यावेळी शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत जोरदार टीका केली. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर या 10 वर्षांत केंद्र सरकारनं दिलेली आश्वासनं आणि वस्तुस्थिती यात जमीन अस्मानाचा फरक आहे. 2014 मध्ये पेट्रोलचे भाव 71 रूपये होते. मात्र, आज पुण्यात पेट्रोलचा भाव 106 रुपये आहे. शब्द द्यायचा आणि त्याची अंमलबजावणी करायची नाही, असं हे सरकार आहे. त्यामुळं त्यांच्या हातात पुन्हा सत्ता द्यायची नाही. मोदींवर टीका केली म्हणून झारखंड आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली. तसंच ममता बॅनर्जी बोलल्या म्हणून त्यांच्या 3 मंत्र्यांना तुरुंगात टाकलं. सत्तेचा उन्माद काय असतो याचं हे उदाहरण आहे. हे सरकार लोकशाही विरोधी असून लोकशाही वाचवायची असेल तर महविकास आघाडीला निवडून द्यावं लागेल."
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या :यावेळी बोलत असताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मी केंद्रातून मागील 10 वर्षांत निधी आणला नाही, अशी टीका माझ्यावर केली जात आहे. मात्र, माझ्यावर टीका करणाऱ्यांनी अद्याप माझा कार्य अहवाल बघितलेला नाही. माझा कार्य अहवाल मराठीत असून मी तो त्यांना पाठवणार आहे, आणि मला विश्वास आहे की त्यांनी तो वाचला तर ते देखील मला नक्कीच मतदान करतील. तसंच मी शारदा बाईंची नात असून मी लढणारी आहे रडणारी नाही", असंही त्या म्हणाल्या.
अमोल कोल्हे काय म्हणाले : "महायुतीच्या नेत्यांकडं धोरणात्मक मुद्दे नसल्यानं ते वैयक्तिक टीका करत आहेत. मात्र, राज्यातील जनतेचं ठरलंय, स्वाभिमानानं तुतारी फुंकायची आणि मशाल पेटवायची. विकासाच्या प्रश्नावर महाविकास आघाडी काम करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे", असं कोल्हे म्हणाले. तसंच 'कचाकचा बटन दाबा तुम्हाला हवा तेवढा निधी देतो' उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या वक्तव्याचाही कोल्हे यांनी चांगलाच समाचार घेतला. लोकशाहीची थट्टा करता का? असा सवाल करत, तुम्ही जो निधी देणार म्हणून सांगता तो तुमचा नाही तर जनतेचा पैसा आहे. स्वतःची मालकी असल्यासारखं वागत असाल तर हा कर त्याच दोन टक्के लोकांकडून घेतला जावा. सत्तेची मस्ती, गुर्मी येते कोठून, असा संतप्त सवालही त्यांनी केला.
हेही वाचा -
- शरद पवारांसोबत उत्तम जानकरांच्या भेटीनंतर गूढ वाढलं, माढा लोकसभा निवडणुकीत जानकरांचा पाठिंबा नेमका कोणाला? - Lok Sabha Election 2024
- वर्धा लोकसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी; रामदास तडस की अमर काळे? - Lok Sabha Election 2024
- उदयनराजेंवर शरद पवारांची खोचक टीका; म्हणाले, राजाबद्दल आम्ही प्रजेनं काय सांगायचं, त्यांची स्थिती... - lok sabha election 2024