येवला (नाशिक) : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी विरोधात राष्ट्रवादी असा सामना रंगताना दिसत आहे. "एखाद्या माणसानं फसवेगिरी किती करावी याला मर्यादा असतात. त्यामुळं अशा धोकेबाजांना तुम्हाला धडा शिकवायचा आहे," असं म्हणत येवल्यात शरद पवारांनी छगन भुजबळांवर टीका केली. येवल्यात महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत शरद पवार बोलत होते. तर शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म शरद पवारांनीच केल्याचा पलटवार छगन भुजबळांनी केला.
ऐतिहासिक सभा : अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांवर शरद पवार प्रचारसभांच्या माध्यमातून जोरदार हल्लाबोल करत आहेत. शरद पवारांचे निकटवर्तीय मंत्री छगन भुजबळ यांनीही त्यांची साथ सोडून अजित पवारांसोबत सत्तेत सहभाग घेतला. त्यामुळं यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून येवला मतदारसंघात उमेदवार देण्यात आला. येवला मतदारसंघात मंगळवारी शरद पवारांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
शरद पवारांचा भुजबळांवर हल्लाबोल : सभेत बोलताना शरद पवार म्हणाले की, "आमच्या सहकाऱ्यानं पक्ष फोडला, तेव्हा भुजबळ सकाळी आले होते, जे झालं ते वाईट झालं, समजूत काढायला जाऊ का? असं मला विचारलं होतं. भुजबळ गेले ते परत आलेच नाही आणि दुसऱ्या दिवशी शपथच घेतली. चुकीचं काम करताना माणसाला काही मर्यादा असतात, त्या भुजबळ यांनी बाकी ठेवल्या नाहीत, अशा लोकांना पुन्हा निवडुन द्यायचं नाही हा विचार तुम्ही करायचा आहे."