छत्रपती संभाजीनगर : "मोदींचे घटना बदलण्याचे मनसुबे लोकसभेत कमी जागा देवून तुम्ही पूर्ण होवू दिले नाही," अशी टीका राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गंगापूर येथील जाहीर सभेत केली. "राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. वर्षभरात जवळपास 950 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतीमालाला भाव नाही, शेतकऱ्यांना आर्थिक मदत नसल्यानं ते त्रस्त झाले आहेत. त्यामुळं लोकसभेप्रमाणे विधानसभेत देखील भाजपा विरोधात मतदान करावं लागेल. त्यामुळं महाविकास आघाडीला मतदान करा," असं आवाहन शरद पवार यांनी केलं.
संविधान वाचले : "लोकसभा निवडणुका नुकत्याच झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चारशे जागा निवडून आणू असा दावा केला होता. मत मागण्यासाठी ते लोकांकडे गेले. घटनेत बदल करण्याचा डाव मोदी आणि सहकाऱ्यांचा होता. मात्र, तुमचं अभिनंदन की, तुम्ही त्यांचा पराभव केला. मागच्या लोकसभेला महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला कमी खासदार मिळाले. मात्र यावेळी चित्र बदललं. त्यामुळं त्यांना चारशे जागा मिळाल्या नाही म्हणून घेटनेत बदल झाला नाही. विधानसभेत देखील अशाच पद्धतीनं भाजपा विरोधी मतदान करावं लागेल," असं आवाहन शरद पवार यांनी केलं.
सभेत बोलताना शरद पवार (ETV Bharat Reporter) शेतकरी आत्महत्या वाढल्या :"शेती मालाच्या किंमती घसरल्या, सोयाबीन, कापूस काही शेतकरी पिकवतो त्यांचे दर कमी झाले आहेत. त्यामुळं लोकसभेत लोकांनी त्यांना पाठिंबा दिला नाही. शेतकरी अडचणीत आहे. गेल्या नऊ महिन्यात 950 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कर्ज घेतलं मात्र काही पिकलं नाही. त्यामुळं शेतकरी आत्महत्या करत असल्याचं चित्र पाहायला मिळालंय. हे चित्र चांगलं नाही. आता शेतीमालाला भाव मिळेल याकडं लक्ष दिलं पाहिजे. आज शेतकऱ्यांना दिलासा हवा असेल तर विधानसभेत देखील चांगला निर्णय घ्यावा लागेल," असं शरद पवार म्हणाले.
प्रशांत बंब यांच्यावर टीका : "मागील पंधरा वर्षापासून गंगापूर मतदारसंघात भाजपाचे आमदार प्रशांत बंब लोकप्रतिनिधी आहेत. महत्त्वाच्या या मतदारसंघात पाणी, रोजगार मिळत नाही. अनेक अडचणी आहेत. इथले आमदार करतात काय? सर्वांना आश्वासन देऊन फसवणूक करणारे महाशय आहेत. त्यामुळं सतीश चव्हाण यांना विजयी करा," असं आवाहन शरद पवार यांनी केलं.
हेही वाचा -
- "शरद पवार माफी मागा," आमदार सुनील टिंगरेंचा कायदेशीर नोटीस पाठवण्याला इन्कार, आता सुप्रिया सुळे प्रत दाखवत म्हणतात...
- "...म्हणून योगींना महाराष्ट्रात आणलं"; 'बटेंगे तो कटेंगे'वरून शरद पवारांचा घणाघात, अशोक चव्हाणांवरही साधला निशाणा
- "लाखो पवार आहेत, पण बिचुकले फक्त एकच"; अभिजीत बिचुकलेंनी दिलं थेट पवारांना आव्हान