नाशिक :राज्य सरकारनं बहिणींसाठी 'लाडकी बहीण योजना' आणली याबाबात माझी तक्रार नाही, पण राज्यात वर्षभरात 850 पेक्षा अधिक मुली गायब झाल्या, याची चिंता आहे. मुंबईत दोन लहान मुलींवर अत्याचार करण्यात आला. या राज्यातील महिला सुरक्षित नाही, महिलांचा सन्मान करणारं हे सरकार नाही. त्यामुळं महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे. नाशिकच्या सिन्नर येथे प्रचारादरम्यान ते बोलत होते.
महायुतीनं सत्तेचा गैरवापर केला :विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या सिन्नर येथे शरद पवार यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना त्यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. "सुरुवातीला मी विधानसभेचा सभासद झालो, मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली, राज्यातील जनतेनं मला चार वेळा मुख्यमंत्री केलं. त्यावेळी महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचं राज्य होतं. आताची स्थिती काय आहे? महाराष्ट्र राज्य विकासाच्या बाबतीत 6व्या क्रमांकावर पोहचलं आहे. महायुती सरकारनं विकासाकडे दुर्लक्ष केलं, सत्तेचा गैरवापर केला जातोय, आता ही स्थिती बदलायची आहे," असं म्हणत शरद पवार यांनी महायुतीवर निशाणा साधला.
भाजपाला घटना बदलायचीय : "लोकसभेत सत्ता स्थापन करायला 300 जागा लागतात, मग भाजपाला 400 जागा का लागत होत्या. त्यांना घटना बदलायची होती, घटनेत बदल करायचा असं त्यांचं सुरू होतं. इंडिया आघाडी त्यावेळी लोकांमध्ये गेली आणि लोकांना जागृत केलं. मला आनंद आहे, की राज्यातील जनतेनं आम्हाला साथ दिली. त्यामुळंच आम्ही 31 जागांवर विजयी झालो. त्यात नाशिकचं खास अभिनंदन कारण जनतेनं राजाभाऊ वाजे, भगरे सर यांना निवडून दिलं," असं म्हणत पवार यांनी भाजपावर निशाणा साधला.
शरद पवारांनी सांगितला 'तो' किस्सा :"महायुती सरकारनं महाराष्ट्रासाठी काय केलं? सिंचनाबाबत काय केलं? शेतकरी आत्महत्या का करत आहे? शेतमालाला उत्तम भाव मिळत नाही, राज्यात कांदा पिकतो, चांगलं उत्पन्न येतं. पण भाव मिळत नाही. मी कृषिमंत्री असताना भाजपाचे लोक गळ्यात कांद्याच्या माळा घालून आले होते. शेतकऱ्याला दोन पैसे मिळत होते, तेव्हा भाजपाचे लोक घोषणा का देत होते. कांद्याच्या माळा घाला, नाहीतर काहीही करा, कांद्याचे भाव कमी करणार नाही म्हणून मी त्यांना सांगितलं," असंही शरद पवारांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा
- कोविडच्या काळात पैसे खाल्लेल्यांच्या बॅगा होतात चेक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
- "इंदिरा गांधी परत आल्या तरी....," कलम 370 वरुन अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
- ठाकरे गटाकडून जोगेश्वरीत गुंडगिरी, राड्याप्रकरणी अनंत नर यांच्याविरोधात गुन्हा दाखल