छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Sharad Pawar On Amit Shah : "काही दिवसांपूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी माझ्यावर ‘भ्रष्टाचाराचा सुभेदार’ असं म्हणत टीका केली. पण ज्यांनी ही टीका केली, त्या देशाच्या गृहमंत्र्यांना कायद्याचं उल्लंघन केलं म्हणून तडीपार करण्यात आलं होतं. गुजरात दंगल प्रकरणी कोर्टानं तडीपार केलं, तो व्यक्ती आज देशाच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळतोय," अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी जाहीर कार्यक्रमात केली. तसंच "राजेश टोपे म्हणाले, माझं बोट धरुन ते राजकारणात आले. मात्र, त्यावर माझा विश्वास नाही. कारण नरेंद्र मोदी देखील असं म्हणाले होते. पण मला माझ्या बोटावर विश्वास आहे," असा खोचक टोलाही शरद पवार यांनी लगावला.
जुन्या आठवणींना दिला उजाळा :शरद पवार यांच्यावर आधारित 'शरद पवार, द ग्रेट इंजिमा' या पुस्तकाचा उर्दू भाषेत अनुवाद करण्यात आला. त्याचं प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत, केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर शरद पवार यांनी टीका केली. तसंच या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी आयुष्यातील प्रमुख घटनांचा उल्लेख केला. ते म्हणाले, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरादरम्यान आमच्या समोर मोठं आव्हान होतं. त्यावेळी असलेल्या पोलीस आयुक्तांनी खूप संदेश पाठवले. अनेकांची घरं जळत आहेत, निर्णय लोकांना मान्य नाही, यात बदलणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. मात्र, डॉ. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, त्यांच्या नावानं असलेलं विद्यापीठ का नको? त्याला विरोध का? त्यावेळी सक्तीचा निर्णय घेणं गरजेचं होत", असं शरद पवार म्हणाले.