मुंबई Shambhuraj Desai News : पुढील महिन्यात लोकसभा निवडणुकीला सुरुवात होणार असून संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात शिवसेनेचे नेते (शिंदे गट) विजय शिवतारे (Vijay Shivtare) उभे राहिले आहेत. तसंच शिवतारे सातत्यानं अजित पवारांवर टीका करत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं महायुतीतील नेत्यांमधील आपसातील वाद आता चव्हाट्यावर आलाय. यावरच आता शिंदे गटाचे नेते तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच युतीधर्म न पाळल्यास विजय शिवतारेंविषयी वेगळा विचार केला जाऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
नेमकं काय म्हणाले शंभूराज देसाई? : यासंदर्भात मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना शंभूराज देसाई म्हणाले की,"विजय शिवतारे हे शिवसेनेचे माजी मंत्री राहिले आहेत. ते सतत सांगत असतात की मी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य करतो, तर त्यांनी पक्षाचा आदेशाचंही पालन केलं पाहिजे. युतीधर्म पाळला पाहिजे. मी काल त्यांना भेटून त्यांची समजूत काढली, पण त्यांनी थोडा वेळ मागितला. मात्र, आपल्याकडं खूप कमी वेळ आहे. त्यामुळं युती धर्माच्या विरोधात तुम्ही कोणतीही भूमिका घेऊ नका, असं मी त्यांना सांगितलं. ज्या ठिकाणी युतीचा कुठलाही उमेदवार असेल त्याच्यासाठी आपल्याला प्रचार करावा लागेल, आणि त्यांना निवडून आणावं लागेल ही आमची भूमिका आहे. पण जर विजय शिवतारे यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली, तर पक्ष त्यांच्या बाबतीत वेगळा विचार करेल."
जागावाटपावरही दिली प्रतिक्रिया : लोकसभा निवडणूक जागा वाटपावरून महायुतीची गुरुवारी (21 मार्च) रात्री बैठक पार पाडली. मात्र, बैठकीतून कोणताही तोडगा निघाला नाही. तर या बैठकी संदर्भात विचारण्यात आलं असताना देसाई म्हणाले की, "कालची बैठक झाली, त्याबाबत आम्हाला काही माहिती नाही. आम्ही माध्यमातूनच बातम्या वाचल्या. अजून अर्ज दाखल करण्यासाठी पाच दिवसांचा अवधी आहे, आणि पाच दिवसांमध्ये खूप काही निर्णय घेतले जाऊ शकतात. विलंब होतोय हे निश्चित आहे, पण चांगली चर्चा करून योग्य उमेदवार दिला आणि तो निवडून आला तर पुढं कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळं आता चर्चा होत आहे. चर्चेतून सकारात्मक निर्णय होईल आणि लवकरच महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटेल."