महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहा, अब्रुनुकसानीच्या खटल्यात पुणे न्यायालयाचे राहुल गांधींना आदेश - SAVARKAR DEFAMATION CASE

लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 2 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश पुण्यातील न्यायालयानं सोमवारी दिले आहेत.

Savarkar defamation case
संग्रहित राहुल गांधी (Source- ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 19, 2024, 11:41 AM IST

पुणे : स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यासंदर्भात महत्त्वाचे अपडेट आहे. पुणे न्यायालयानं लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना 2 डिसेंबरला न्यायलयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिलेत.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी एप्रिल 2023 मध्ये पुणे न्यायालयात खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला. यावर पुणे न्यायालयात सोमवारी ( 19 नोव्हेंबर) सुनावणी झाली.

याचिकाकर्ते सात्यकी सावरकर यांचे वकील संग्राम कोल्हटकर म्हणाले, " राहुल गांधी यांच्यावतीने वकील मिलिंद पवार यांनी न्यायालयात धाव घेतली. काँग्रेसचे नेते पुढील तारखेला न्यायालयात हजर होतील, असे सांगण्यात आले. मात्र, राहुल गांधी यांची बाजू मांडणारे जाधव यांच्याकडं वकालतनामा नसल्यानं आम्ही आक्षेप घेतला. त्यावर वकील जाधव यांनी कोणत्याही परिस्थितीत गांधी न्यायालयात हजर राहतील," असे सांगितलं. यावर न्यायालयानं राहुल गांधी यांना 2 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

खटल्याच्या सुनावणीत यापूर्वी काय घडलं?यापूर्वी पुणे न्यायालयानं पोलिसांना आरोपांची चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. विश्रामबाग पोलिसांनी चौकशी केली असता तक्रारीत प्रथमदर्शनी सत्य असल्याची माहिती समोर आली. 4 ऑक्टोबर रोजी विशेष न्यायालयानं राहुल गांधी यांना 23 ऑक्टोबर रोजी हजर राहण्यास सांगून समन्स बजावले होते. मात्र, राहुल गांधी हजर झाले नाहीत. समन्स मिळाले नसल्यानं हजर राहता आले नाही, असे राहुल गांधींच्या वकिलांनी न्यायालयात म्हटलं होतं.

काय आहे अब्रुनुकसानीचा खटला?मार्च 2023 मध्ये राहुल गांधी यांनी लंडनमधील भाषणात सावरकरांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावेळी राहुल गांधींनी म्हटलं, " एका पुस्तकात लिहिलयं की सावरकर आणि त्यांच्या पाच ते सहा मित्रांनी एकदा एका विशिष्ट समुदायातील माणसाला मारहाण केली. त्यामुळे सावरकर यांना आनंद वाटला." प्रत्यक्षात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यानुसार सावरकरांनी तसे म्हटल्याचे कुठल्याही पुस्तकात लिहिले नाही, असा सात्यकी यांनी याचिकेत म्हटलं आहे.

हेही वाचा-

  1. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंची शेवटची पत्रकार परिषद; राहुल गांधींसह उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
  2. महाराष्ट्रातील 7 लाख कोटी किमतीचे प्रकल्प राज्याबाहेर गेले-राहुल गांधी

ABOUT THE AUTHOR

...view details