जळगाव : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालायनं मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणाला परवानगी दिली आहे. त्यामुळे तहव्वूर राणा याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तहलव्वूर राणा याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाल्यानं मुंबई बॉम्बस्फोटाचा खटला लढवणारे वकील उज्वल निकम यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा भारताच्या कूट नीतीचा मोठा विजय असल्याचं उज्वल निकम यांनी स्पष्ट केलं आहे.
काय म्हणाले उज्वल निकम : "मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा यानं मुंबई हल्ल्याप्रकरणी मला भारतात पाठवू नये, असा बचाव घेतला होता. मात्र त्याच्या बचावामध्ये तथ्य नाही, असा पवित्रा अमेरिकेच्या कोर्टानं घेतला. त्यामुळे भारतात त्याला आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तहव्वूर राणा याच्या चौकशीतून 26/11 च्या हल्ल्यासंबंधीत अनेक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. तहव्वूर राणा हा पाकिस्तानच्या आर्मीमध्ये डॉक्टर होता. त्यामुळे त्याचा पाकिस्तानच्या आर्मीशी काय संबंध होता. 26 /11 च्या घटनेशी नेमका त्यांचा काही संबंध होता का याची सुद्धा माहिती राणा याचा चौकशीतून समोर येण्याची शक्यता आहे," असं ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांनी स्पष्ट केलं.
अमेरिकन न्यायालयानं फेटाळली तहव्वूर राणाची याचिका : "मुंबई दहशतवादी हल्यातील प्रमुख आरोपी तहव्वूर राणाचं अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण होण्याला परवानगी मिळली. हे भारताच्या कुट नितीमधील मोठे यश आहे. अमेरिकेत राहून दहशतवादी कृत्य करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, हे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणातून जगाला दाखऊन दिलं आहे. तहव्वूर राणानं शिकागो न्यायालयात आपल्याला भारतात केलेल्या कृत्यबद्दल अगोदर शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे आपल्या भारतात पाठवण्यात येऊ नये, अशी मागणी अमेरिकन न्यायालयात केली. मात्र अमेरिकेनं यामध्ये सखोल तपास करत तहव्वूर राणाच्या म्हणण्यात तथ्य नसल्याचं लक्षात घेतलं. त्यानंतर न्यायालयानं त्याला भारतात प्रत्यार्पण करण्यास परवानगी दिली आहे. ही भारतासाठी मोठी गोष्ट आहे. तहव्वूर राणा आणि डेव्हिड हेडली हे एकाच माळेचे मणी आहेत. तहव्वूर राणा आणि डेव्हिड हेडलीचे पाकच्या आयएसआय संघटनेशी कसे संबंध राहिले आहेत, यावर तहव्वूर राणा भारतात आल्यानं, प्रकाश पडण्याची शक्यता आहे," असं विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा :
- तहव्वूर राणाच्या पळवाटा बंद, भारतात प्रत्यार्पण होण्याच्या प्रक्रियेवर उज्ज्वल निकम काय म्हणाले?
- Mumbai Terror Attack : मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरण; तहव्वूर राणाविरोधात पोलिसांनी दाखल केलं आरोपपत्र
- मुंबई 26/11 बॉम्बस्फोट प्रकरण : दहशतवादी तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण करणं योग्य, भारताला पूर्ण अधिकार, यूएस अॅटर्नीचा जोरदार युक्तीवाद - Mumbai Terror Attack