मुंबई- बीडमधील सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी हत्येच्या निषेधार्थ शनिवारी मुंबईत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला बीड, परभणी, धाराशिव, पैठण, छत्रपती संभाजीनगर आदी भागातून माणसे आली होती. मुंबईतील मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान, सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आलीय. या मोर्चात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेबाबत एक खळबळजनक वक्तव्य केलंय. दरम्यान, आता आव्हाडांच्या वक्तव्यानंतर राजकीय गोटातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
त्याने बलात्कारच केला नाही : दरम्यान, या मोर्च्यात बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे. बीड, परळीमधील जी गुंडगिरी आणि गुन्हेगारी आहे, तिला आळा बसलाच पाहिजे. ही लढाई वंजारी विरुद्ध मराठा अशी नाही, तर जिथे अन्याय होतोय तिथे आपण पेटून उठलेच पाहिजे. कोणत्याही धर्म, जात, पंथ न पाहता एखाद्याला मदत केलीच पाहिजे. दरम्यान, बदलापूर घटनेमधील अक्षय शिंदेबाबत माणसे बोलायला घाबरत आहेत. कारण बलात्काराची केस आहे. आपल्या अंगावर येईल म्हणून बोलायला घाबरत आहेत. परंतु अरे अक्षय शिंदेनं बलात्कार केलाच नाही, बलात्कार केलेल्यांना सोडवण्यासाठी, त्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या झाली, असं खळबळजनक गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. मात्र आव्हाडांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.
सुरेश धस यांची नाराजी : दुसरीकडे बीड आणि परभणीतील हत्येप्रकरणी मुंबईत मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या मोर्चाला भाजपा आमदार सुरेश धस हे पोहोचलेच नाहीत. सुरेश धस यांच्या गैरहजेरीवरून चर्चा होतेय. विशेष म्हणजे सुरेश धस यांनीसुद्धा आव्हाडांच्या वक्तव्यावरून हात झटकलेत. जितेंद्र आव्हाड यांनी अक्षय शिंदे याने बलात्कार केला नसल्याचं वक्तव्य मी ऐकलं आणि हे वक्तव्य मला आवडलेलं नाही, असंही सुरेश धस यांनी म्हटलंय. मात्र सुरेश धस यांनाही जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर दिलंय. मला कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही, मला जे वाटते ती माझी भूमिका मी मांडतोय, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. परंतु जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या खळबळजनक वक्तव्यानंतर याचे राजकीय वर्तुळात येत्या काळात पडसाद उमटण्याची दाट शक्यता वर्तविली जातेय.
हेही वाचा -