शिर्डी : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा पालकमंत्रिपदावरुन पत्ता कट करण्यात आलाय. बीडचे पालकमंत्री पद हे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडं देण्यात आलंय. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याच्यामुळं धनंजय मुंडेंवर आज ही नामुष्की ओढावल्याचं बोललं जातंय. दरम्यान, यावरच आता धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे? :आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसीय नवसंकल्प शिबिर पार पडले. या शिबिराला धनंजय मुंडे उपस्थिती राहणार नसल्याची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, आज शिबिराच्या समारोपाच्या दिवशी मुंडे यांनी हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "राजकारण आणि समाजकारण करत असतांना अधिक ऊर्जा मिळावी यासाठी साईबाबांपुढं नतमस्तक होणं गरजेचं आहे." यावेळी पालकमंत्रिपदासंदर्भात विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "बीडची सध्याची परिस्थिती पाहता मी स्वतःचं मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की, बीडचं पालकमंत्री पद अजित पवारांना देण्यात यावं. अजित दादा पुणे जिल्ह्यांप्रमाणे बीडचा विकासदेखील करतील", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter) आरोप सिद्ध करून दाखवावा : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी करण्यात येणाऱ्या आरोपांविषयी बोलताना ते म्हणाले, "माझ्यावर करण्यात येत असलेल्या आरोपातील एक तरी आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवावा. माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. वेळ आली की याबाबतची सर्व उत्तर देईल. विनाकारण माझ्यावर आरोप करू नये. मला यावर आता काही बोलायचं नाहीय. आताची परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यातील सर्व समाज्यात सलोखा निर्माण व्हावा, असं माझ्यासारख्या मातीतील माणसाला वाटतंय. सर्वांना विनंती आहे की मला बदनाम करायचंय तर करा. परंतु, माझ्या बीड जिल्ह्याला बदनाम करू नका", असं आवाहनही त्यांनी विरोधकांसह टीकाकारांना केलंय.
- सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर विरोधकांसह भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जाहीर टीका करण्यात आली. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे हे वारंवार टीकेचे धनी ठरले होते. सध्या, एसआयटी, सीआयडी आणि न्यायालयीन समितीकडून सरपंच हत्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
हेही वाचा -
- अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा होता पण. .: अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्या?
- धनंजय देशमुख यांचं 'शोले स्टाईल' आंदोलन मागे, मनोज जरांगे आणि पोलिसांनी केली विनंती
- गुजरातचं ड्रग्ज कनेक्शन परळीत, सुरेश धस यांचा जनआक्रोश मोर्चात सनसनाटी आरोप