मुंबई Sanjay Raut On CM Eknath Shinde: शुक्रवारी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजलं. पण शेवटच्या दिवशी राज्याचे मंत्री दादा भुसे आणि कर्जत विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे (Dada Bhuse Mahendra Thorave Fight) यांच्यात शाब्दिक चकमक होऊन धक्काबुक्की झालीय. यावरून विरोधकांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आवाज उठवला. या मुद्द्यावर खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावत, आता शिंदे गॅंगमध्ये गँगवॉर सुरू झाल्याचं म्हटलंय. ते मुंबई बोलत होते.
हे एक प्रकारचं गॅंगवॉर :शुक्रवारी विधिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे आणि शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये जी काही भानगड झाली त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, हा एक प्रकारचा 'गॅंगवॉर' आहे. हा शिंदे गॅंगमध्ये असलेला गॅंगवॉर आहे. ज्यानी मुंबईचा अंडरवर्ल्ड बघितला आहे, तो आम्ही सुद्धा पाहिला आहे. तर तेव्हा ज्या गॅंग होत्या त्या गॅंगमध्ये गॅंगवॉर व्हायचं आणि तीच लोक एकमेकांच्या विरोधामध्ये लढायची.
विकासाची व्याख्या बदलायला हवी :शिंदे गॅंगमध्ये सुद्धा आता त्याच पद्धतीचं गॅंगवॉर सुरू आहे. एक मंत्री आणि एक आमदार विधानसभेमध्ये मारामारी करतात. एक दुसऱ्यांना शिव्या देतात आणि फडवणीस म्हणतात, सर्व ठीक आहे. हाच आमचा विकास आहे का? असं असेल तर विकासाची व्याख्या बदलावी लागेल. आरएसएसला मी पत्र लिहिणार आहे. महाराष्ट्र मध्ये जे गॅंगवॉर सुरू आहे, त्याला जर तुमचे लोक विकास म्हणत असतील तर विकासाची व्याख्या तुम्ही बदलायला हवी, असंही राऊत यांनी म्हटलंय.
हाच तुमचा विकास आहे का : संजय राऊत पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी म्हणतात अजित पवारांनी ७० हजार कोटींचा घोटाळा केलाय. तसंच आदर्श स्कॅम हा यूपीएचा देशातील सर्वात मोठा स्कॅम आहे. मोदी हे भ्रष्टाचाराबद्दल बरच काही सांगतात. परंतु या सर्व भ्रष्टाचारी लोकांना एकत्र घेऊन मोदी देश चालवत आहेत हा देशाचा विकास आहे. मला फडवणीसांना हेच विचारायचं आहे की, हाच तुमचा विकास आहे का? ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा, २५ हजार कोटींचा शिखर बँक घोटाळा याबाबत जर देशामध्ये सर्वात जास्त आवाज कोणी उठवला असेल, तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उठवला होता.