श्रीनगर : घरात गुदमरल्यानं तब्बल 5 जणांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना जम्मू काश्मीरमधील श्रीनगर शहराजवळील पंरथन या गावात घडली. एजाज अहमद भट असं या घटनेतील कुटुंबप्रमुखाचं नाव असून ते श्रीनगरमधील एका हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करत होते. मात्र रविवारी त्यांच्यासह त्यांची पत्नी आणि तीन मुलांचा या घटनेत मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
घरात गुदमरुन 5 जणांचा मृत्यू : एजाज अहमद भट हे बारामुल्ला जिल्ह्यातील उरी इथल्या गावातील राहणारे होते. एजाज अहमद भट हे एका खासगी हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करत होते. श्रीनगरजवळील पंथरन या गावात ते मुख्तार अहमद यांच्या घरात दोन महिन्यांपासून भाड्यानं राहत होते. मात्र रविवारी त्यांची आई त्यांना कॉल करत होती, मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांच्या आईनं मुख्तार अहमद यांना कॉल करुन एजाज अहमद भट हे फोनला प्रतिसाद देत नसल्याचं सांगितलं. यावेळी मुख्तार अहमद यांनी शेजाऱ्यांना घरी जाऊन पाहण्यास सांगितलं असता, घरात एजाज अहमद भट यांच्यासह त्यांची पत्नी, तीन मुलं मृत असल्याचं उघडकीस आलं.
काय म्हणाले पोलीस अधिकारी : घरात गुदमरुन 5 जणांचा मृत्यू झाल्यानं जम्मू काश्मीरमध्ये मोठी खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी चापही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात पाठवले. याबाबत बोलताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं, की "मृतांमध्ये आई-वडील आणि त्यांची दोन अल्पवयीन मुलं आणि 28 दिवसांपूर्वी जन्मलेल्या एका चिमुकलीचा समावेश आहे. एजाज अहमद भट असं वडिलांचं नाव आहे, जो श्रीनगरमधील ललित ग्रँड पॅलेस या खासगी हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करत होता." अधिकाऱ्यांनी सांगितलं की, गुदमरल्याचा संशय गरम ब्लोअरमुळे झाला असावा. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय श्रीनगर आणि रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे. थंडीमुळे काश्मीरमधील नागरिक तापमानवाढीसाठी विविध यंत्रं वापरतात. त्यामुळे खोल्यांमध्ये कार्बन मोनोऑक्साइड वाढते. ऑक्सिजनची पातळी कमी होऊन रहिवाशांचा मृत्यू होतो.
आईनं फोन करुनही मिळत नव्हता प्रतिसाद : एजाज अहमद भट हे मूळचे बारामुल्ला जिल्ह्यातील उरी तहसीलमधील एका गावातील रहिवाशी होते. मात्र ते श्रीनगरच्या बाहेरील पंरथन इथं भाड्याच्या घरात राहत होते. तर घरमालक मुख्तार अहमद यांच्या म्हणण्यानुसार, "हे कुटुंब दोन महिन्यांपासून भाड्यानं राहत होतं. त्यांना मृत एजाज अहमद भटच्या आईनं माहिती दिली. एजाजची आई वारंवार फोन करत असूनही त्यांना कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता, त्यामुळे त्यांनी मला सांगितलं. एजाज भट यांच्या आईनं दुपारी 4.30 वाजतापासून कॉल्सला प्रतिसाद देत नसल्याचा फोन केला. त्यानंतर मी घराची तपासणी करण्यासाठी शेजाऱ्यांना पाठवलं. त्यांनी दार ठोठावलं मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आम्ही दार उघडलं असता, एजाज भट, त्यांची पत्नी आणि तीन मुलं मृतावस्थेत आढळून आली."
हेही वाचा :