कोल्हापूर -विधानसभा निवडणुकीला अजून दोन महिन्यांचा अवधी असला तरीही जिल्ह्यात निवडणुकीचा वारं जोरात वाहत आहे. अनेक नेत्यांनी आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. पूर्वाश्रमीचे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि कागलच्या समूहाचे प्रमुख समरजीत घाटगे मंगळवारी शरद पवारांच्या उपस्थित शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत.
समरजीत घाटगे यांची विशेष मुलाखत (Source- ETV Bharat Reporter) "यापूर्वी झालेल्या सहा विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचा हसन मुश्रीफ यांना आशीर्वाद होता. मात्र, या निवडणुकीत शरद पवारांचा आशीर्वाद मला मिळणार आहे. त्यामुळे मंत्री मुश्रीफांचं काय करायचं? हे जनता ठरवेल," असा हल्लाबोल घाटगे यांनी केलाय. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी असलेल्या कागलला वेगळा इतिहास आहे. आतापर्यंत राजर्षी शाहू महाराजांच्या नावानं राजकारण करणाऱ्या मंत्री हसन मुश्रीफांनी कागलचा शाश्वत विकास केला का? कागल ही राजर्षी शाहू महाराजांची जन्मभूमी असताना त्याचं मार्केटिंग का झालं नाही? असा सवाल उपस्थित करत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचा आशीर्वाद मिळणं, ही जमेची बाजू असल्याचं समरजीत घाटगे यांनी सांगितलं.
कागलची सभा ऐतिहासिक होईल- 2009 च्या लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांची सभा झाली होती, त्याचप्रमाणे आजची खासदार शरद पवार यांची सभा ऐतिहासिक होणार आहे. गेल्या 25 वर्षांच्या राजकीय भूमिकेत मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपण पुरोगामी विचार पुढं नेत असल्याचं म्हटलं होतं. मात्र त्यांनी जाणून-बुजून छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव असलेल्या कागलचे मार्केटिंग किती केलं? असा सवाल उपस्थित करत समरजीत घाटगे यांनी मंत्री मुश्रीफ यांच्या पुरोगामी विचारावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. कोल्हापूरच्या राजकारणात होणार मोठी उलथा-पालथ2019 च्या विधानसभा निवडणुकीत कागलचे विद्यमान आमदार मंत्री हसन मुश्रीफ यांना समरजीत घाटगे यांनी कडवी टक्कर दिली होती. कागलच्या शाहू समूहाचे प्रमुख समरजीत घाटगे यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीत तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. कागलच्या गैबी चौकात पवारांच्या उपस्थितीत आज हा प्रवेश होणार असल्याने संपूर्ण जिल्ह्याचं याकडे लक्ष लागलं आहे.
अशी आहे कागलमधील राजकीय परिस्थिती : कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरही समरजीत घाटगे यांनी नाराजी व्यक्त केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची समजूत काढत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. कागलच्या राजकारणात हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. राज्यात 2019 ला विधानसभा निवडणुकीत हसन मुश्रीफ यांनी समरजित घाटगे यांचा पराभव केला. याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी समरजितसिंह घाटगे यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.
हेही वाचा-
- Hasan Mushrif On Kolhapur Visit: मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर हसन मुश्रीफ आज कोल्हापुरात पहिल्यांदाच येणार, समरजीत राजेंना काय देणार उत्तर?