महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

अमित ठाकरे आणि सदा सरवणकर एकाच दिवशी दाखल करणार उमेदवारी अर्ज, 'राज'पुत्राला मिळणार कमळाची साथ?

माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेचे अमित ठाकरे आणि शिवसेनेचे सदा सरवणकर यांच्यात लढत आहे. दोघेही उमेदवार सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

Maharashtra Assembly Election 2024 Sada Saravankar against Amit Thackeray in Mahim Assembly Constituency
अमित ठाकरे, सदा सरवणकर (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : 13 hours ago

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सोमवारी (28 ऑक्टोबर) अमित ठाकरे सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे अमित ठाकरे हे ठाकरे कुटुंबातील दुसरे सदस्य आहेत. तर याच दिवशी विद्यमान आमदार सदा सरवणकरदेखील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यामुळे सोमवारी मनसे आणि शिवसेनेचे जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे.


अमित ठाकरेंसाठी महायुती मागे हटणार? : शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. तर, महेश सावंत हे शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीनं रिंगणात आहेत. अशातच आता अमित ठाकरे यांच्यासाठी महायुती आपला उमेदवार मागे घेणार असल्याच्या राजकीय चर्चा सुरू आहेत. शनिवारी (26 ऑक्टोबर) सकाळी भाजपा नेते आशिष शेलार यांनी महायुती अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबतचं वक्तव्य केलं. त्यानंतर लगेचच रात्री विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी आपल्या मतदारसंघात विविध विभागात लोकांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. या रात्रीच्या भेटींमध्ये आमदार सदा सरवणकर हे शक्तिप्रदर्शन करत असल्याचं दिसून येतंय. यादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना सदा सरवणकर यांनी आपण सोमवारी 28 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं जाहीर केलंय.

माहीम विधानसभा मतदारसंघात तिहेरी लढत : माहीम विधानसभा मतदारसंघात तिहेरी लढत होईल हे चित्र स्पष्ट झालं असलं तरी महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाची साथ मात्र मनसेच्या अमित ठाकरेंना मिळेल अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. तेव्हा अमित ठाकरे त्यांच्या वडिलांसोबत उपस्थित होते. या भेटीनंतर दादरच्या शिवाजी पार्क येथे झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी आपण भाजपाला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं होतं. याच पाठिंब्याची आठवण अमित ठाकरे यांनी भाजपाला करून दिली आहे. दुसरीकडं राज ठाकरे हे आपल्या भावापासून (उद्धव ठाकरे) दूर राहिले असले तरी भाजपा मात्र त्यांच्याजवळ आहे. आता माहीममध्ये भाजपाची भूमिका काय असणार? हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे.

भाजपा युती धर्म निभावणार? : 2009 पासूनच्या विधानसभा निवडणुकांचा विचार केला असता मनसेला प्रत्येक निवडणुकीत चाळीस हजारांहून अधिक मतं मिळत आली आहेत. 2009 मध्ये याच विधानसभा मतदारसंघातून मनसेचे नेते नितीन सरदेसाई 48 हजार मतांनी निवडून आले होते. तर, 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून संदीप देशपांडे यांना 42 हजार मतं मिळाली होती. त्यामुळं माहीममध्ये मनसेची ताकद दुर्लक्षित करून चालणार नाही. यात मनसेला भाजपाचा पाठिंबा मिळाला तर त्या मतांची आणखी भर पडेल. 2014 मध्ये सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. त्यावेळी भाजपानं विलास आंबेकर यांना उमेदवारी दिली होती. 2014 मध्ये आंबेकर यांना 33 हजार मतं मिळाली होती. त्यामुळं या भागात भाजपाचे देखील मतदार आहेत. अशा राजकीय परिस्थितीत भाजपा अमित ठाकरे यांना पाठिंबा देणार? की भाजपा युती धर्म निभावणार? येत्या काही दिवसांत हे राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा -

  1. 'राज'पुत्रा समोर दुहेरी आव्हान, माहीम विधानसभेत अमित ठाकरेंच्या विरोधात शिंदे आणि ठाकरेंचे उमेदवार रिंगणात
  2. ...अन् माझ्या पोटात गोळाच आला, उमेदवारी जाहीर केल्यानंतर अमित ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना
  3. अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात; विधानसभेसाठी मनसेच्या 45 उमेदवारांची घोषणा, वाचा संपूर्ण यादी

ABOUT THE AUTHOR

...view details