पुणे Rupali Chakankar : रुपाली चाकणकर म्हणाल्या, अजित पवारांनी खासदार सुप्रिया सुळेंचा प्रचार केला. त्यांनी निवडून आणलं हे सुप्रिया सुळे पवार यांनी अखेर मान्य केलं. त्याच्याबद्दल मी त्यांची मनापासून आभारी आहे, अशी खोचक टीका राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे पवार यांच्यावर केलीय. सुप्रिया सुळे यांनी "माझ्या वेळेस एवढं फिरावं लागत नव्हतं, माझा प्रचार करण्यासाठी अजित पवार फिरत होते, " असे वक्तव्य केलं होतं. त्याला आता रुपाली चाकणकरांनी प्रत्युत्तर दिलंय.
भाऊबीजची ओवाळणी म्हणून खासदारकी दिली : रुपाली चाकणकर म्हणाल्या, "अजित पवारांना त्यांना निवडून आणण्यासाठी किती कष्ट करावे लागत होते, हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. पण अजित पवारांनी त्यांच्यापर्यंत ते कधी पोहोचू दिलं नाही. इतकी भावाची माया दिली. खरंतर अनेकांचा विरोध पत्करुन अजित पवारांनी पंधरा वर्षे सुप्रिया सुळे यांना निवडून आणलंय. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. त्यांनी पंधरा वर्षे प्रचार केलेला आहे. या सगळ्यांमध्ये पंधरा वर्षे भाऊबीजेची ओवाळणी म्हणून खासदारकी दिलीय." तसंच या सगळ्या गोष्टींवर त्यांचं समाधान व्हायला हवं होतं, असंही रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत. "बारामती लोकसभेत अजित पवारांनी केलेली विकास कामं मोठ्या प्रमाणात आहेत. चांगल्या प्रमाणात निधी दिलेला आहे. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी प्राधान्यक्रम दिला," असे चाकणकर यांनी म्हटले.