मुंबई Ramdas Athawale : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं महायुतीला लोकसभा निवडणुकीत सर्वत्र मतदान केलं आहे. यापुढंही महायुतीला आरपीआयकडून मदत होणार आहे. मात्र त्याबाबत महायुतीकडूनही आरपीआयला सत्तेत योग्य वाटा मिळायला हवा असा पुनरुच्चार रिपाइंचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मुंबईत केला. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आपल्या पक्षाला एक मंत्रीपद आणि विधान परिषदेची एक जागा मिळावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
मंत्रिमंडळ विस्तारात रिपाईंला एक मंत्रिपद द्यावं : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले शनिवारी विधानभवनात आले होते. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य करताना लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात यावा आणि या मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला एक मंत्रीपद देण्यात यावं अशी मागणी केली. तसंच विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीमध्येसुद्धा रिपाईं पक्षाला एक पद देण्यात यावं अशीही मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर दोन महामंडळं आणि तालुका समित्यांमध्ये रिपाईंच्या कार्यकर्त्यांना समाविष्ट करुन घेण्यात यावं अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.