मुंबई Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : महायुती सरकारच्या 25 महिन्यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल 22 हजार 364 फाईल्सचा निपटारा केल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आलीय. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या तुलनेत मुख्यमंत्र्यांनी दुप्पट फाईल्सचा निपटारा तर तिप्पट कामांना मंजुरी दिलीय. यावरुन मुख्यमंत्र्यांवर महायुतीतून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. तर दुसरीकडं मात्र विरोधक यावरुन टीका करत असल्याचं बघायला मिळतय.
मुख्यमंत्र्यांची सर्वोत्तम कामगिरी : मुख्यमंत्री कार्यालयातून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार 1 जुलै 2022 ते 31 जुलै 2024 या कार्यकाळात मुख्यमंत्री कार्यालयाकडं एकूण 23 हजार 674 फाईल्स प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी 22 हजार 364 फाईल्सचा निपटारा केला गेलाय. राज्यातील विकासकामांचे प्रस्ताव आणि जनहिताच्या फाईल्सचा वेगाने पाठपुरवठा करून मुख्यमंत्री कार्यालयानं मंजूर केल्या आहेत. राज्यातील मुख्यमंत्री कार्यालयाची ही आजपर्यंतची सर्वोत्तम विक्रमी कामगिरी असल्याचं बोललं जातय. तर 1 जानेवारी 2020 ते 20 मे 2022 या महाविकास आघाडी सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री कार्यालयात एकूण 11 हजार 227 फाईल्स प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी केवळ 6 हजार 824 फाईल्स मंजूर करण्यात आल्या.
फेसबुक नाही तर फेस टू फेस काम करणारे मुख्यमंत्री :महाविकास आघाडीचं सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फेसबुक लाईव्हवरुनच सरकार चालवत होते, असा आरोप महायुतीतील नेत्यांकडून वारंवार केला जात होता, आताही तसा आरोप होत असतो. त्यानंतर आता मुख्यमंत्री कार्यालयातून आकडेवारी समोर आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात राज्यातील विकास खुंटला, राज्य डबघाईला गेलं, अशी टीका केली जात आहे. तर एकनाथ शिंदे यांचं सरकार फेसबुकवर नाही, तर फेस टू फेस काम करणारं सरकार असल्याचं म्हणतही ठाकरे गटाची खिल्ली उडवली जात आहे.