कोल्हापूर Balasaheb Thackeray Birth Anniversary :साधारणता 90 च्या दशकातील ही गोष्ट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा भला मोठा गाड्यांचा ताफा कोल्हापुरातल्या कावळा नाक्यावर थांबला होता. बाळासाहेबांची राहण्याची सोय शासकीय विश्रामगृह येथे करण्यात आली होती. मात्र बाळासाहेबांच्या चाणाक्ष नजरेने 'अयोध्या हॉटेल'वर लावलेला भगवा ध्वज वेधला. अन चालकाला सांगून बाळासाहेबांनी आपली गाडी थेट आयोध्या हॉटेलच्या दारात थांबवली. अचानक घडलेल्या या घटनेमुळं सगळेच भांबावले होते. बाळासाहेब मात्र थेट हॉटेलमध्ये गेले आणि हॉटेलमध्येच मुक्काम करण्याचा बेत आखला. तेव्हापासून बाळासाहेब जेव्हा जेव्हा कोल्हापूरला तेव्हा तेव्हा मुक्काम पोस्ट 'अयोध्या हॉटेल' असाच त्यांचा पत्ता ठरलेला असायचा.
हॉटेल अयोध्याची उभारणी : कोल्हापूरच्या शानबाग ग्रुपकडून 1988 वर्षी कोल्हापुरातल्या प्रसिद्ध कावळा नाका आणि आताचा ताराराणी चौक परिसरात हॉटेल अयोध्याची उभारणी करण्यात आली. तेव्हापासून रामकृष्ण शानबाग आणि त्यांचे सुपुत्र सचिन शानबाग यांच्याकडून अयोध्या हॉटेल चालवले जाते. साधारणता 90 च्या दशकात राज्यात शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचा झंजावात जोरात होता. त्या काळात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी यांच्यासह शिवसेनेतील अनेक वरिष्ठ नेते कोल्हापूर दौऱ्यावर आले होते.
अवघा महाराष्ट्र सभेसाठी एकवाटायचा : प्रखर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाळासाहेबांची अमोघ वाणी ऐकण्यासाठी अवघा महाराष्ट्र त्यांच्या सभेला एकवाटायचा. त्या काळात बाळासाहेबांना झेड प्लस सारखी उच्च दर्जाची सुरक्षा होती. कोल्हापूर परिसरातील अयोध्या हॉटेलवर बाळासाहेबांनी भगवा ध्वज पाहिला अन ते थेट हॉटेलमध्ये गेले. हॉटेल मालक रामकृष्ण शानबाग यांनी त्यांना हॉटेल संबंधी सर्व माहिती दिली. मी राज्यभर फिरतोय मात्र कोणत्याही हॉटेलवर मला भगवा दिसला नाही. तुमच्या हॉटेलच्या इमारतीवर भगवा ध्वज डौलाने फडकत असल्याचं दिसलं आणि मी थेट तुमच्या हॉटेलमध्ये आलो, अशी प्रतिक्रिया त्यावेळी बाळासाहेबांनी दिली होती. अशी आठवण रामकृष्ण शानबाग यांचे सुपुत्र सचिन शानबाग यांनी सांगितली.