अमरावती - मोर्शी शहरात एका युवकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी 7 वाजताचे सुमारास उघडकीस आली. मोर्शी ते अमरावती मार्गावर येरला गावाजवळ असलेल्या शिरभाते मंगल कार्यालयाजवळ ही घटना घडली. मृत तरुणाचं नाव सुनील अनंत चवरे, वय 19 वर्ष आहे.
घटनास्थळी पोलिसांचा ताफा - तरुण युवकाचा मृतदेह शेताच्या काटेरी कुंपणात नग्नावस्थेत आणि डोक्यावर प्रहार करण्यात आलेला मोठा दगड रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर, अमरावती येथील ग्रामीण पोलीस, अमरावती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. मोर्शीचे ठाणेदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात मोर्शी पोलिसांचा ताफा घटनस्थळी तैनात करण्यात आला. श्वानपथक आणि मोबाईल युनिट तसंच उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार यांनासुद्धा या ठिकाणी पाचारण करण्यात आलं.
फोन आला आणि घरून निघाला - याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोर्शी शहरातील श्रीकृष्ण पेठ येथील अरविंद रवाळे यांचे घरी अनंत चवरे हे पत्नी आणि आपल्या दोन मुलांसह गेल्या आठ ते दहा वर्षापासून भाड्याने राहात आहेत. 23 जानेवारी रोजी संध्याकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मृतक सुनील चवरे याने आपले वडील अनंत यांच्याकडे अंगातील जर्किन काढून दिले होते. त्यावेळी त्याच्या मोबाईलवर फोन येत असताना तो घरून सिंभोरा चौकातून येतो, म्हणून सांगून गेला. मात्र तो रात्री घरी परत आला नसल्यामुळे अनंत चवरे आणि त्यांच्या पत्नी यांनी मोर्शी पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलगा घरी परत आला नसल्याची तक्रार दिली होती.
पेट्रोल पंप आणि दारू दुकानात करायचा काम - मृतक सुनील चवरे हा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचे, हॉटेल बारवर दारूच्या दुकानात काम करायचा. त्याचा खून नेमका कुणी केला असावा, याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणाचा छडा लवकरच लागेल असं पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सांगितलं.
हेही वाचा..