मुंबई BJP MNS Alliance : मनसे आणि भाजपामध्ये युती होणार याबाबतच्या चर्चा राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतरच जास्त प्रमाणात सुरू झाल्या होत्या. आता तर लोकसभा निवडणुका असल्यानं या चर्चांना अधिकच बळ आलंय. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेचे युवा नेते अमित ठाकरे हे दिल्ली दरबारी दाखल झाले आहेत. त्यामुळं भाजपासोबत मनसेची युती होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसे संकेतही मागील काही दिवसांपासून भाजपा तसंच शिंदे गटाच्या नेत्यांकडून मिळत होते.
राज-अमित दिल्लीत : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे दिल्लीत दाखल झाले आहेत. ते भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. लोकसभेसाठी महायुतीकडून मनसेला दोन ते तीन जागा अपेक्षित असल्याची चर्चा सुरू आहे. हे किती शक्य आहे हा प्रश्न असला तरी मुंबई दक्षिण हा लोकसभा मतदारसंघ मिळावा यासाठी मनसेचे नेते आग्रही असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मनसेचे तडफदार नेते बाळा नांदगावकर यांना मुंबई दक्षिणमधून उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा आहे.
राज ठाकरेंनी दिले होते संकेत : मार्चच्या पहिल्या आठवड्यात मनसेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम नाशिकमध्ये आयोजित केला होता. त्यावेळी तरी राज ठाकरे हे लोकसभेबाबत आपली भूमिका मांडतील, अशी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, जे काही बोलायचं आहे ते मी मुंबईतील गुढीपाडव्याच्या सभेतूनच बोलेन, असं बोलून राज ठाकरेंनी अनेक प्रश्न उपस्थित करायला भाग पाडलं होतं. त्यामुळे त्यावेळेसची चुप्पी ही आता दिल्लीला जाऊन बंद दाराआड होणाऱ्या चर्चांसाठी तर नव्हती ना? असा प्रश्न राजकीय वर्तुळात ऐकू येतो.
फडणवीस, बावनकुळे दिल्लीत : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या दिल्लीत आहेत. त्यामुळं लोकसभा निवडणुकीसाठी मनसेला महायुतीत सामील करुन घेण्याच्यादृष्टीनं महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली दरबारी होऊ शकतो. राज ठाकरे हे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतही राज ठाकरे हे बैठक करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळं भाजपाकडून राज ठाकरे यांना कोणत्या जागेसाठी प्रस्ताव देण्यात येणार याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. आतापर्यंत भाजपाच्या अनेक नेत्यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. परंतु, या भेटीगाठींपलीकडं दोन्ही पक्षांमधील युतीच्यादृष्टीनं काही ठोस घडलं नव्हतं. मात्र, लोकसभा निवडणुकीच्यानिमित्तानं भाजपा-मनसे युती प्रत्यक्षात येऊ शकते अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे.