मुंबई Lok Sabha Elections: रायगडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांना उमेदवारी दिल्यानं तिथे मोठ्या प्रमाणामध्ये अंतर्गत नाराजी असून रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये महायुतीला उमेदवाराची निवड न करता आल्यानं संभ्रमाचं वातावरण आहे. या मतदारसंघातून भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे इच्छुक असून त्यांना याच मतदारसंघातून शिंदे गटाचे नेते, मंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांच्याकडून 'काटे की टक्कर' दिली जाण्याची शक्यता आहे. तर या मतदारसंघात सुद्धा नारायण राणे यांना आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करावी लागत आहे.
नाराज धैर्यशील पाटील काय करणार :रायगड लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीकडून उबाठा गटाचे अनंत गिते हे यंदा उमेदवार असणार आहेत. अनंत गिते यांनी १९९९, २००४, २००९ आणि २०१४ अशा चार वेळा रायगडमधून विजय प्राप्त केला होता. रायगड हा एक प्रकारे शिवसेनेच्या वर्चस्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे. मागच्या २०१९ च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंनी शिवसेनेच्या अनंत गिते यांचा पराभव केला आणि ते या मतदारसंघातून खासदार झाले. यंदा पुन्हा एकदा महायुतीकडून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना उमेदवारी देण्यात आलीय. अशात ही लढत अनंत गिते विरुद्ध सुनील तटकरे अशी होणार असताना अलिबागचे भाजपाचे आमदार धैर्यशील पाटील हे सुद्धा त्यांना उमेदवारी न दिल्यानं नाराज झाले असून ते स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.
रायगडची निवडणूक तिरंगी : अशा परिस्थितीमध्ये रायगडची निवडणूक तिरंगी होणार आहे. वास्तविक रायगड या लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचं तसं फारसं अस्तित्व नव्हतं. याच कारणानं भाजपानं शेकापामधून धैर्यशील पाटील यांना आपल्या पक्षात घेतलं आणि आपली ताकद या मतदारसंघात निर्माण करण्याचा प्रयत्न केला. धैर्यशील पाटील यांनी सुद्धा २०१९ मध्ये भाजपामध्ये प्रवेश करून लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं तयारीला सुरुवात केली होती. परंतु ऐन मोक्याच्या क्षणी त्यांचा पत्ता कट करून महायुतीकडून ही जागा सुनील तटकरे यांना देण्यात आल्यानं भाजपा कार्यकर्ते सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये नाराज असून त्याचा फटका सुनील तटकरे यांना बसू शकतो.
तटकरेंसाठी लढाई अवघड: रायगड लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाचे महाडचे आमदार भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी तसेच दापोलीचे आमदार योगेश कदम हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. तर श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे या आमदार असून पेण विधानसभा मतदारसंघात रवींद्र पाटील हे भाजपाचे आमदार आहेत. तर गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे एकमेव उबाठा गटासोबत आहेत. मागच्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार अनंत गिते यांना ४,५५,५३० मतं मिळाली होती. तर काँग्रेस-राष्ट्रवादी-शेकाप यांच्या आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांना ४,८६,९६८ मतं मिळाली होती. विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत अनंत गिते यांना शेतकरी कामगार पक्षाची साथ मिळाली आहे. ही अनंत गिते त्याचबरोबर महाविकास आघाडीसाठी फार मोठी जमेची बाजू असल्याकारणानं सुनील तटकरेंसाठी ही लढाई तितकी सोपी नसणार आहे.
नारायण राणे की किरण सामंत: दुसरीकडं कोकणातील महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदार संघातून कुणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचं यावरून महायुतीचं घोडं अद्याप अडकलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा राज्यसभेवरून पत्ता कट केल्यानंतर त्यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदार संघातून निवडणुकीच्या मैदानात उतरवलं जाण्याची अपेक्षा आहे. परंतु विशेष म्हणजे या मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी शिंदे शिवसेना गटाचे नेते, मंत्री उदय सामंत यांनी त्यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांच्यासाठी पूर्ण शक्ती पणाला लावली आहे. वस्ताविक रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा मतदार संघ शिवसेनेच्या बाले किल्ल्यांपैकी एक आहे. या मतदारसंघातून उबाठा गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी २०१४ आणि २०१९ साली विजय संपादन केला असून ते यंदा हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहेत.